Big Breaking : राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नियंत्रणाखाली असलेल्या रुग्णालयांतील उपचार पूर्णतः मोफत केले आहेत. त्यापाठोपाठ आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न असणाऱ्या राज्यातील २९ रुग्णालयांतील वैद्यकीय उपचार व सेवा मोफत केल्या जाणार आहेत.
वैद्यकीय शिक्षण विभागाने प्रस्ताव तयार केला असून, तो मंजुरीसाठी मंत्रिमंडळासमोर ठेवला जाणार आहे.आयुष्मान भारत योजना व महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत ५ लाख रुपयांपर्यंतच्या आरोग्य खर्चाची हमी शासनाने घेतली आहे.
या योजनांमधून राज्यातील सर्व नागरिकांना याचा फायदा होत आहे. त्याचबरोबर राज्यातील प्रत्येक नागरिकास आरोग्यासाठी चांगले उपचार मिळावेत, यासाठी राज्य सरकारने आरोग्य विभागाच्या नियंत्रणाखाली असलेल्या सर्व सरकारी रुग्णालयांतून मोफत उपचाराचा निर्णय घेतला आहे.
सरकारी रुग्णालयांत रुग्ण शुल्क, तपासण्या व विविध आजारांवरील उपचारांसाठी किमान दर आकारला जात असे. त्यात वार्षिक उत्पन्न कमी असणाऱ्या रुग्णांना वेगवेगळ्या सवलती दिल्या जात होत्या. आता सरसकट सर्वच रुग्णांना निःशुल्क तपासण्या, उपचार व सेवा दिल्या जात आहेत.
१५ ऑगस्टपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. हा निर्णय वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न रुग्णालयांना लागू नव्हता. गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया, विविध तपासण्या येथे होतात. यामधील काहींवर मोफत व माफक दरात उपचार होतात, तर काहींना ठरावीक उपचार, तपासण्यांचे पैसे भरावे लागत होते.
राज्यात वैद्यकीय विभागाशी संलग्न २६ शासकीय महाविद्यालये आणि ३ दंत महाविद्यालये आहेत. शहरासह ग्रामीण भागातील हजारो रुग्ण उपचारासाठी या रुग्णालयांत रोज येतात. रुग्णांकडून केसपेपर, विविध तपासण्या, शस्त्रक्रिया उपचारामधून शासनाला ९० कोटींहून अधिक महसूल मिळत आहे.