Ahmednagar News : कृषी उत्पन्न बाजार समितीने आजपासून शेतमाल घेऊन येणाऱ्या प्रत्येक वाहनावर रुपये दहा असा प्रवेशकर आकारण्याचा निर्णय घेतला. याला मी झिझिया कर असे मानतो, तेंव्हा तात्काळ आपला प्रवेश कराचा निर्णय मागे घ्यावा. तसेच मोकळे आणलेले धान्य, कांदे यांची तोलाई हमाली तात्काळ रद्द व्हावी,
मागणीसाठी सोमवारी (दि.४) सकाळी दहा ते बारा या वेळेत आपण कोपरगाव बाजार समितीच्या दारापुढे ढोल बजाव आंदोलन करून सत्याग्रह करणार असल्याचा इशारा येथील सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी बाजार समिती सचिव यांना पाठविलेल्या पत्राद्वारे दिला आहे.
याबाबत दिलेल्या पत्रात संजय काळे यांनी म्हटले आहे की, राज्यात दुष्काळाचे सावट आहे. कोपरगाव तालुका दुष्काळी असल्याबाबत जाहीर करावा म्हणून तालुक्याचे आजी-माजी आमदार व्हाटसप पाण्यात घालून बसलेले आहे.
आणि सगळ्यांची संयुक्त सत्ता असलेली बाजार समिती बाजारात येणाऱ्या प्रत्येक वाहनावर प्रवेश कर लावत आहे. बाजारात रोजसाधारण सहाशे ते सातसे वाहने शेतीमाल घेऊन येतात.
शेतमालाला एमएसपी प्रमाणे भाव मिळतो की नाही ही शंका आहे. परंतु प्रवेशालाच दहा रूपयांचा दंड शेतकरी मोजणार हे निश्चित स्पष्टीकरण देताना असे सांगण्यात आले की, बाजार समिती शेतकऱ्यांना व्हाटसपद्वारे बाजार भावाची माहिती देणार आहे.
त्यासाठी हा निधी उभारला जात आहे. याबाबत संजय काळे यांनी म्हटले आहे की, बाजार समिती शेतकऱ्यांचे खिशावर डल्ला मारण्यात निष्णात आहे. प्रत्येक शेतकऱ्याकडून तोलाई प्रति क्विंटल घेतली जाते.
पण वाहनाचे माप मोठ्या काट्यावर ते देखील शेतकऱ्याचे पैशाने होती. बाजारात हजार रुपयात अमर्याद मोबाइल डाटा महिन्यासाठी मिळतो. मग बाजार समिती शेतकऱ्यांच्या खिशावर रोज सहा ते सात हजारांचा डल्ला मारणार आहे का?
शेतकऱ्याकडून प्रति क्विंटल हमाली घेतली जाते. परंतु शेतकरी हायड्रोलीक ट्रॅलीतून आपला माल व्यापाऱ्याचे जागेवर उतरून जातो. तरी त्याला हमाली द्यावीच लागते. दुदैवाने बाजार समितीचा कारभार ग्रामीण भागातून निवडून आलेले शेतकरीच पहात आहेत.