कोणतेही राज्य बरखास्त करून त्यांचे दोन भाग करण्याचे धाडस मोदी सरकार करत आहे !

Ahmednagarlive24 office
Published:
Politics News

Politics News : सत्ता टिकवण्यासाठी लोकांना भडकावण्यासह फोडाफोडीचे राजकारण केंद्रातील मोदी सरकार करत आहे, असा आरोप खासदार व ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी केला. कोल्हापूर येथील लोकजागरच्या वतीने गुरुवारी (दि. ३१) दसरा चौकातील राजर्षी शाहू स्मारक भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘सध्याची राजकीय परिस्थिती आणि भविष्यातील भारत’ या विषयावरील मुक्त संवादात ते बोलत होते.

खासदार केतकर म्हणाले, मोदी सरकारकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे. धाडसत्र, अटक, बेबंदशाही व दबंगशाही करत आम्ही काहीही करू शकतो, अशा आविर्भावात केंद्रातील भाजप सरकारची वाटचाल सुरू आहे.

२०२४ च्या निवडणुकीत केंद्रात भाजपची सत्ता कायम राहिल्यास केंद्र आणि राज्य यांच्यातील संघर्ष अटळ आहे. कोणतेही राज्य बरखास्त करून त्यांचे दोन भाग करण्याचे धाडस मोदी सरकार करत आहे. संविधान बदलण्याच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या भाजप सरकारकडून देशाच्या अखंडतेलाही धोका निर्माण झाला आहे.

देशाचे विघटन होईल, अशीच सध्या प्रक्रिया सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. लोकशाही संपवून अध्यक्षीय सत्तेसाठी पंतप्रधान मोदी यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे ते कोणालाही जुमानत नाहीत.

गुजरातमध्ये मुख्यमंत्री असताना जशी परिस्थिती होती, तीच परिस्थिती केंद्रातही आहे. भाजप सरकार व आरएसएस या दोघांचीही भीती मोदींना नाही.. कोणालाही न जुमानत मोदी यांच्या हुकूमशाही कार्यपद्धतीमुळे आरएसएसमध्येही असंतोष निर्माण झाला आहे. गुजरात आणि उत्तर प्रदेश या दोन राज्यांतच भाजपचे प्राबल्य राहिले आहे.

खासदार केतकर म्हणाले, २०१२-१३ मध्ये काही लोकांवर मोदींचे गारुड निर्माण झाले. त्यामुळे २००९ मध्ये राष्ट्रीय काँग्रेसने लोकसभेच्या २०६ जागा जिंकल्या होत्या, तर २०१४ मध्ये केवळ ४४ जागा जिंकल्या.

हा करिश्मा भाजपमुळे नव्हे, तर मोदींमुळे झाला आहे. काँग्रेसचीच मते भाजपला मिळाली. त्यामुळे त्यांचे संख्याबळ वाढले. आगामी २०२४ च्या निवडणुकीत भारताला भाजपमुक्त करणे आवश्यक आहे, तरच देशाचे संविधान शाबूत राहून लोकशाही टिकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe