संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथील मृत्यु पावलेल्या वृध्द व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या आणखी एका व्यक्तीला करोनाची लागण झाली आहे. ही ३६ वर्षीय व्यक्ती धांदरफळ येथीलच आहे.
त्यामुळे जिल्ह्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या आता ५३ झाली आहे. तर, धांदरफळ येथील करोना बाधित रुग्णांची संख्या आता ०८ झाली आहे.
अहमदनगर जिल्हा आणि संगमनेर तालुक्यात वाढणारी करोना रुग्णांची संख्या चिंताजनक असून अफवांवर विश्वास न ठेवता सर्वांनी या अदृश्य विषाणूची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याची गरज आहे,’ असे प्रतिपादन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
लॉकडाऊन आणि विविध नियमांमुळे ‘करोना’चा प्रसार रोखण्यास यश आले आहे. असे असले तरी येत्या काही दिवसांत ‘करोना’चे संकट संसर्गाच्या टप्प्यावर येऊ पाहत आहे.
त्यामुळे नागरिकांनी शक्यतो घराबाहेर पडण्याचे टाळावे,’ असे ते म्हणाले. ‘शहरांमधून पायी जाणाऱ्या परराज्यातील श्रमिकांनी संयम पाळायला हवा.
त्यांच्या भोजन आणि निवासाची व्यवस्था राज्य सरकारने केली आहे. त्यांना आपल्या गावी परतण्यासाठी सरकार आणि काँग्रेस पक्ष मदत करीत आहे,’ असेही थोरात यांनी यावेळी बोलताना सांगीतले.