Success Story:- कुठल्याही गोष्टीची सुरुवात करत असताना ती अगदी छोट्या स्वरूपातून करून हळूहळू त्यामध्ये वाढ करणे खूप गरजेचे असते. परंतु हे करत असताना अचूकपणे व्यवस्थापन देखील तेवढेच गरजेचे असते. तुम्ही एखादा व्यवसाय स्थापन करायचे ठरवले तरी तुम्ही जर छोट्याशा प्रमाणात व्यवसायाची सुरुवात केली व सगळ्या बाजूने अभ्यास करून जर हळूहळू त्यामध्ये वाढ केली तर कालांतराने या छोट्याशा व्यवसायाचे रूपांतर मोठ्या व्यवसायात होते हे अनेक उदाहरणांवरून आपल्याला सांगता येईल.
या सर्व प्रवासामध्ये संबंधित व्यक्तीचे कष्ट तसेच जिद्द असतेच परंतु त्या दृष्टिकोनातून केलेले अभ्यासपूर्ण प्रयत्न देखील तेवढेच महत्त्वाचे असतात. एखादा व्यवसाय स्थापन करून त्याच व्यवसायाशी निगडित असलेले इतर व्यवसाय उभारणे व ते देखील वाढवणे हा देखील एक व्यवसाय कौशल्याचा भाग असतो.
अगदी याच मुद्द्याला धरून जर आपण सांगली शहरातील वसंतलाल एम शहा अँड कंपनीचा प्रवास पाहिला तर तो अशा पद्धतीचा असून थक्क करणारा आहे. अगदी टप्प्याटप्प्याने आणि खूप नियोजनाने त्यांनी मोठ्या प्रमाणावर या कंपनीचे साम्राज्य उभे केले आहे व त्यांची यशोगाथा आपण या लेखात बघणार आहोत.
पत्र्याच्या शेडमध्ये केली शेंगपेंड विक्रीला सुरुवात
वसंतलाल मोहनलालजी शहा हे मूळचे गुजरात राज्यातील जामनगर येथील रहिवासी होते व रोजगार मिळावा याकरिता 1958 यावर्षी सांगलीमध्ये आले. वयाच्या पंधराव्या वर्षी घराबाहेर पडलेले वसंतलाल शहा यांनी रोजगार म्हणून रतनजी खिमजी शहा कंपनीमध्ये कामाला सुरुवात केली. त्यांचा स्वभाव खूप बोलका आणि गोड असल्यामुळे अनेक माणसे जोडण्यात त्यांना यश मिळाले व या सामर्थ्यावर आणि या फर्मच्या मदतीनेच वखार भागामध्ये बारा रुपये भाड्याने पत्राचे शेड घेतले व यामध्ये शेंगपेंड विकायला सुरुवात केली.
शेंगपेंड विक्रीचे नियोजन करताना त्यांनी सांगलीतील वखार भागातील शेतकऱ्यांची बैल तसेच गाडीवान हमाल यांच्यावर लक्ष केंद्रित केले व अशा पद्धतीने सुरुवात केली. हा व्यवसाय चांगल्या पद्धतीने परवडत असल्यामुळे त्यांनी मोठे भाऊ शांतीलाल शहा यांना देखील बोलवून घेतले व व्यवसायातील इतर बाबी शांतीलाल यांनी सांभाळल्या व बघता बघता सांगलीच्या मार्केटमध्ये वसंतलाल एम. शहा हे नाव प्रसिद्ध झाले.
1961 मध्ये फर्मची नोंदणी केली व 1959 ते 1968 या कालावधीमध्ये फक्त शेंगदाणा पेंड विक्रीचा व्यवसाय त्यांनी केला. परंतु हा व्यवसाय वाढवण्याकरिता त्यांनी शेंगदाणा पेंड शेतीसाठी किती उपयुक्त आहे हे शेतकऱ्यांना पटवून दिले व हा त्यांचा स्वतःचा फार्मूला त्यांनी संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात पोहोचवला. अशा पद्धतीने व्यवसाय सुरू असताना 1976 मध्ये एमआयडीसी ने बाजारामध्ये आणलेले सुग्रास या प्रसिद्ध पशुखाद्याची विक्री देखील त्यांनी सुरू केली. गुरांच्या गोठ्यांपर्यंत सुग्रास पोहोचवण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली.
शेतीशी संबंधित असलेल्या व्यवसायात प्रवेश
शेंगदाणा पेंड विक्री व्यवसाय खूप चांगल्या पद्धतीने चालत असताना हरितक्रांतीचे वारे देशात वाहायला लागले. तेव्हा परिस्थितीनुरूप बदल स्वीकारून त्यांनी झुआरी या सरकारी आणि धरमजी मोरारजी या खाजगी खत कंपन्यांची डीलरशिप देखील घेतली. या सगळ्या माध्यमातून ते शेतीपर्यंत कृषी तंत्रज्ञान पोहोचावे याकरिता खूप प्रयत्न करत राहिले.
त्यानंतर त्यांची नवीन पिढी या व्यवसायात 1985 दरम्यान दाखल झाली व वडील व काकांनी सुरू केलेला व्यवसाय मोठ्या प्रमाणावर वाढवायचा असा निश्चय करून शांतीलाल यांचे पुत्र निगम भाई आणि जतिन भाई यांनी शेंगदाणा पेंडी विक्री सोबतच सरकी पेंड विक्री सुरू केली. सुरुवातीला एक वर्षभर एक ट्रक सरकी पेंड विकणारे निगम भाई आणि जतीन भाई आज सांगलीच्या बाजारपेठेमध्ये दररोज 40 ते 50 ट्रक सरकी पेंड विकतात.
हरितक्रांतीच्या वाऱ्यामध्ये संकरित बियाणे मोठ्या प्रमाणावर बाजारपेठेमध्ये आले व परिस्थितीनुसार बदल स्वीकारत त्यांनी या व्यवसायाकडे मोर्चा वळवला. त्याकरता त्यांनी हिंदुस्तान लिव्हर तसेच महाबिजसारख्या महत्त्वाच्या कंपन्यांची डीलरशिप देखील घेतली. 63 वर्ष जुनी असलेली ही कंपनी सध्या पशुखाद्य, शेतीसाठी आवश्यक खते व कीडनाशके तसे बी बियाण्याच्या विक्रीमध्ये खूप प्रसिद्ध असून नवतंत्रज्ञानाला साथ घालत निगम भाई व राजेश भाई या दोन्ही भावांनी 1995 मध्ये प्रतीक इंडस्ट्रीजची स्थापना केली व या इंडस्ट्रीच्या माध्यमातून सूक्ष्म अन्नद्रव्य,
जैविक व सेंद्रिय खते तसेच कीडनाशक, बुरशीनाशके, बेदाणा निर्मितीसाठी डीपिंग ऑइल उत्पादित करतात. न्यूट्रॉल यस व न्यूट्रल इफेक्ट, बायो लाईव्ह पीएसबी, के एन बी, बायो ब्रो तसेच निसर्ग, बायो गार्ड तसेच ट्रायकोडर्मा इत्यादी अनेक उत्पादने त्यांनी लोकांपर्यंत, देशातील बाजारपेठेपर्यंत पोहोचवली. देशातच नाही तर आखाती तसेच आफ्रिकन व युरोपियन देशांसह ऑस्ट्रेलियातमध्ये देखील त्यांनी त्यांची उत्पादने पोहोचवली आहेत.
सध्या निगमभाईंची दोन मुले प्रतिक आणि हर्ष आता व्यवसाय सांभाळत असून प्रतिक इंडस्ट्रीचे कार्यकारी संचालक प्रतीक असून त्यांनी नेदरलँड विद्यापीठातून ऑरगॅनिक ॲग्रीमध्ये एम एस केलेले आहे व हर्ष यांनी प्रोडक्शन इंजिनिअरिंग मधील बीटेक पूर्ण केलेल्या असून शिक्षणाची व व्यवसायाची सांगड उत्तम पद्धतीने घालण्यात हे कुटुंब यशस्वी ठरले आहे.
अशा पद्धतीने 1959 मध्ये लावलेले छोटेसे व्यवसायाचे रोपटे आज मोठ्या वटवृक्षामध्ये रूपांतरित झाले आहे.