Agricultural News : पावसाने चांगलीच ओढ दिल्याने खरीपातील पिके आता हातातुन जाण्याची भीती निर्माण झाली आहेत. ज्या भागात पाटपाण्याची व्यवस्था आहे, त्या ठिकाणी पिकांना काहीसे जीवदान मिळाले असले, तरी अनेक भागात पावसावर शेती असल्याने पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली आहे.
अनेक भागातील पिकं सुकली आहे. लवकरच दमदार पावसाने हजेरी लावली नाही, तर खरीपाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तवली आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील मोठ्या, मध्यम धरणांमध्ये सध्या ८० टक्के जलसाठा असून, याचा उपयोग पिण्याच्या पाण्यासह खरिपाची पिके जगविण्यासाठी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
जिल्ह्यात यंदा सरासरीच्या निम्माही पाऊस झाला नाही. उत्तर नगर जिल्ह्यातील घाटमाथ्यावर झालेल्या जुलै महिन्यातील पावसामुळे धरणाची स्थिती समाधानकारक आहे. भंडारदरा, निळवंडे, मुळा या मोठ्या प्रकल्पांमध्ये पाणीसाठा चांगला आहे.
मात्र, दक्षिण नगर जिह्यातील मध्यम प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याची घट झाली आहे. जिल्ह्यात पिण्यासह पिकांची स्थिती आता गंभीर झाली आहे. जून महिन्यात पावसाळ्यास सुरुवात झाली.
मात्र दोन महिन्यांत चार नक्षत्रांचा कालावधी संपला. अनेक तालुक्यांमध्ये सरासरीच्या निम्माही पाऊस झाला नाही. राहुरी, श्रीरामपूर या तालुक्यात सरासरीच्या निम्म्यापेक्षा कमी पाऊस आहे. संगमनेर, कोपरगाव, राहाता या तीन तालुक्यामध्ये सरासरीच्या निम्म्यापेक्षा थोडा जास्त पाऊस झाला आहे.
जिल्ह्यातील मोठ्या व मध्यम प्रकल्पामध्ये ५१ हजार ९३ दलघफू पाणीसाठा असतो. त्यात ४५ हजार १२२ दलघफू हा उपयुक्त पाणीसाठा असून, सध्या आजच्या तारखेला ४० हजार १४९ दलघफू पाणीसाठा आहे. तो गेल्यावर्षी आजच्या तारखेला ४८ हजार ३४३ दलघफू होता.
मात्र, यंदा भंडारदरा धरण पूर्ण भरले असले, तरी मुळा, निळवंडे ही धरणे भरली नाहीत. १५ ऑगस्टपर्यंत सर्व धरणे भरतात. यंदा केवळ भंडारदरा हे एकमेव धरण भरले. १ ऑगस्ट ते ८ ऑगस्टपर्यंत पिण्याचे व त्यानंतर शेतीसाठी आवर्तन सोडण्यात आले आहे.
त्यामुळे ज्या भागात पाटपाणी उपलब्ध होणार आहे, त्या पिकांना काही प्रमाणात जीवदान मिळाले. परंतु, पावसावर अवलंबून असलेली मोठ्या क्षेत्रावरील पिके अखेरची घटका मोजत आहेत.