Ahmadnagar Breaking : अलीकडच्या काळात मौल्यवान वस्तुसह शेतकऱ्यांची जनावरे, शेतीची अवजारे आता तर शेतातील शेतमालासह फळे देखील चोरीला जाण्याच्या घटना घडत असल्याने शेतकऱ्यांसमोर हा बिकट प्रश्न उभा ठाकला आहे.
नुकतीच नगर तालुक्यातील मठपिंप्री गावच्या शिवारातून चक्क तिन लाख रूपये किमतीच्या डाळिंबाच्या फळांची चोरी केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, नगर तालुक्यातील मठपिंप्री येथे पराग विनायक निसळ (रा. श्री विनायक २७अ, सातभाई मळा दिल्ली गेट अ.नगर) यांची शेती आहे.
सध्या निसळ यांच्या शेतात डाळिंबची बाग असून बागेत चांगल्या प्रतिची फळे आलेली होती. मात्र दि.८ सप्टेंबर रोजी रात्री ८ ते १२ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी निसळ यांच्या बागेतून तब्बल ३ लाख रूपये किमतीची डाळिंबाची फळे चोरून नेली.
याप्रकरणी निसळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. बागेतून फळांची चोरी होत असल्याच्या घटनामुळे आता शेतकऱ्यांना रात्री देखील शेतीची राखण करावी लागण्याची वेळ आली आहे.