भंडारदरा पर्यटनस्थळाचे प्रमुख आकर्षण असलेला धबधबा कधी सुरू होणार?

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : अकोले तालुक्यातील भंडारदरा हे ठिकाण निसर्ग पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. याच परिसरात ब्रिटिशांनी दोन डोंगराच्या टेकड्या अडवून आपल्या अक्कल हुशारीने भंडारदरा धरणाची निर्मिती केली. त्यावेळी इंग्लडहून येणाऱ्या ब्रिटीश पाहुण्यांना एक आगळा वेगळा निसर्गाचा नजारा पाहायला मिळावा या उद्देशाने भंडारदरा धरणाच्या अगदी पायथ्याशी एका मोठ्या खडकाचा आधार घेत छत्रीच्या आकाराचा एक धबधबा तयार करण्यात आला.

ज्यावेळी या खडकावरुन भंडारदरा धरणाचे पाणी सोडण्यात येते, तेंव्हा खडकावरुन पडणारे पाणी छत्रीच्या आकारासारखे दिसते. म्हणून ब्रिटिशांनीच या खडकावरुन पडणाऱ्या धबधब्याचे अंब्रेला धबधबा असे नामकरण केले. पुढे या धबधब्याच्या मोहामध्ये सिनेसृष्टीही अडकली. या धबधब्यासह खेटुनच असलेल्या भंडारदरा धरणाच्या बगिच्यामध्ये अनेक हिंदी व मराठी चित्रपटांचे चित्रीकरण झाले.

भंडारदरा पर्यटनस्थळाचे प्रमुख आकर्षण असलेल्या अंब्रेला धबधब्याचे दर्शन पर्यटकांसाठी दुर्लभ झाले असून हा धबधबा तातडीने सुरू करण्याची मागणी पर्यटकांसह स्थानिक व्यापारी व नागरीकांनी केली आहे. धबधबा हा गत तीन ते चार वर्षांपासून दुरुस्तीच्या नावाखाली कायमस्वरुपी बंद करण्यात आला आहे.

आज मात्र अंब्रेला धबधबा कोसळताना दिसत नसून याचे दर्शन पर्यटकांसाठी दुर्लभ झाले आहे. गत तीन ते चार वर्षांपासून हा धबधबा दुरुस्तीच्या नावाखाली भंडारदरा धरण शाखेकडून कायमस्वरुपी बंद करण्यात आलेला आहे.

भंडारदरा धरणातून पाण्याचा विसर्ग या धबधब्यातून होण्याऐवजी कायमच विजनिर्माण केंद्रातून होत आहे. हा धबधबा न सोडण्याचे कारण वीजनिर्माण केंद्र तर नाही ना? भंडारदरा धरण शाखा व ज्या कंपनीने विजनिर्माण केंद्र चालविण्यास घेतले आहे, त्यांच्यात काही गौडबंगाल तर नाही ना, असे अनेक प्रश्न या धबधबा न सोडण्याच्या कारणाने उपलब्ध होत आहेत.

या अंब्रेला धबधब्याच्या आसपास अनेक स्थानिक आदिवासी युवक आपली छोटी मोठी दुकाने पावसाळ्यात थाटत असतात. चांगला रोजगार या युवकांना यामुळे उपलब्ध होत असतो; मात्र तीन वर्षापासुन या युवकांचा पाणी न सोडण्याच्या कारणास्तव रोजगार बुडाला असून ते बेकार झाले आहेत. हा धबधबा सुरू केला गेला तर भंडारदऱ्याच्या पर्यटनात आणखी भर होण्यास मदत होणार आहे.

हा धबधबा प्रत्येक शनिवारी व रविवारी कमीत कमी दोन ते तीन तास सुरू करण्यात यावा, अशी मागणी भंडारदरा जलपूजनाच्या वेळी शेंडीचे ग्रामस्थ डॉ. दिलीप बागडे यांनी केली होती; परंतु धरण शाखेकडून कोणत्याही प्रकारचे पाऊल उचलले गेले नाही. त्यामुळे हा धबधबा तातडीने सुरू करण्याची मागणी पर्यटकांसह नागरीक व व्यापाऱ्यांनी केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe