Ahmednagar News :- श्रीगोंदा तालुक्यात मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर कायम असून, शनिवारी संध्याकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे सलग तिसऱ्या दिवशी तालुक्यातील बहुतांश भागात पावसाने दमदार हजेरी लावली असून,
विसापूर येथील नदीला पूर आल्याने विसापूर पारनेर रस्त्यावरील पुलावर पाणी आल्याने वाहतूक ठप्प होऊन रस्ता काही काळ वाहतुकीसाठी बंद झाला होता.
तालुक्यात मुसळधार पाऊस होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर तालुक्यात काही ठिकाणी तुरळक पाऊस पडला होता. मात्र, मागील दोन अडीच महिन्यानंतर श्रीगोंद्यात सलग तीन दिवस जोरदार पाऊस होत आहे.
तीन दिवसांपासून श्रीगोंदा शहरासह कोळगाव, घारगाव, विसापूर, बेलवंडी, हिरडगाव, घोडेगाव, पिंपळगाव पिसा, या भागात मुसळधार तर अन्य भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला होता. त्याचबरोबर गेले दोन दिवस अनेक भागात रात्रीचा चांगलाच भिजपाऊसदेखील झाला.
शनिवारी सकाळपासून दिवसभर उकाडा जाणवत असल्याने पावसाची अपेक्षा होती. त्याप्रमाणे दुपारी तीन वाजल्यापासून अनेक भागात पावसाला सुरुवात झाली. श्रीगोंदा शहरासह तालुक्याच्या काष्टी, लिंपणगाव, ढोकराई, शिरसगाव बोडखा, मढेवडगाव, भानगाव, मांडवगण, आढळगाव, वडाळी, विसापूर आदी गावांमध्ये दमदार पाऊस झाला.
विसापूर येथील नदीला पूर आल्याने विसापूर पारनेर रस्त्यावरील पुलावर पाणी आल्याने वाहतूक ठप्प होऊन रस्ता काही काळ वाहतुकीसाठी बंद झाला होता. गेल्या दोन तीन दिवसांत झालेल्या पावसाने शेतातील उभ्या पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. त्याचबरोबर पावसाचा जोर कायम असल्याने बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.