सातारा, दि. 11 ( जि.मा.का ) : सातारा जिल्ह्यात विविध औद्योगिक वसाहती आणि इतर ठिकाणी काम करणारे श्रमिक लॉकडाऊनमुळे अडकून पडले होते.
त्यांना त्यांच्या गावी सुखरूप पाठविण्यासाठी आज सातारा रेल्वेस्थानकावरून स्पेशल श्रमिक रेल्वे मध्य प्रदेशातील रेवा कडे आज सोडण्यात आली.
यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, उपजिल्हाधिकारी संजय आसवले, प्रांत मिनाज मुल्ला, तहसीलदार आशा होळकर उपस्थित होते.
पर राज्यातील अडकून पडलेल्या श्रमिकांना विशेष रेल्वेतून सोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून तयारी करण्यात आली असून सातारा जिल्ह्यातील विविध कंपन्या आणि इतर ठिकाणी काम करणाऱ्यांसाठी पहिली रेल्वे आज मध्य प्रदेश शासनाकडून मान्यता मिळाल्यानंतर सातारा येथून सोडण्यात आली.
या रेल्वेत 1320 श्रमिक असून त्यांना जेवणाचे पार्सल, पिण्याचे पाणी प्रशासनांकडून देण्यात आले आहे. ही रेल्वे उद्या दुपारी दीडच्या दरम्यान रेवा येथे पोहोचणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर ते घरी जायचे म्हणून सगळे श्रमिक आंनदात होते.