Maharashtra Rain:- यावर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीपासून जर पावसाचे प्रमाण पाहिले तर जून ते आतापर्यंत हवा तेवढा पाऊस महाराष्ट्रमध्ये झालेला नाही. जून महिन्याची सुरुवातच मुळी निराशाजनक झाली व त्यानंतर जुलै महिन्यात महाराष्ट्रामध्ये सर्व दूर पाऊस पडला व रखडलेल्या खरिपाच्या पेरण्या देखील पूर्ण झाल्या.
परंतु ऑगस्ट महिन्यामध्ये पावसाने खूप मोठा खंड दिला व खरिपाच्या पेरण्या देखील धोक्यात आल्या होत्या. मात्र त्यानंतर सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला दोन ते चार दिवस महाराष्ट्रात पावसाला सुरुवात झाली परत त्यानंतर पावसाने उघडीप दिलेली होती.

परंतु आता गेल्या दोन ते तीन दिवसापासून राज्याच्या बऱ्याच भागांमध्ये चांगला पाऊस होत असून पिकांना जीवदान मिळेल अशी शक्यता निर्माण झाली आहे. तसेच धरणातील पाणीसाठ्यांमध्ये वाढ होण्यास या पावसाने मदत झाली तर पिण्याचा पाण्याचा प्रश्न देखील काही प्रमाणात सूटण्यास यामुळे मदत होईल अशी अपेक्षा आहे.या अनुषंगाने येणाऱ्या तीन ते चार दिवस महाराष्ट्रात पाऊस कसा राहील याबाबतची महत्वपूर्ण माहिती आपण या लेखात बघणार आहोत.
महाराष्ट्रात कसा राहील पाऊस?
आज मुंबई तसेच रायगड व रत्नागिरी, पालघर, ठाणे आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी विजांच्या कडकडाटा सोबतच वादळी वारे आणि पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तसेच मध्य महाराष्ट्रातील जळगाव, धुळे आणि नंदुरबार व नाशिक या ठिकाणी देखील विजेच्या कडकडाटासह रिमझिम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.
त्यासोबतच पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर त्या ठिकाणी पुणे, सांगली, सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यात अति मुसळधार पावसाचा अंदाज असून या ठिकाणच्या नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे व या सर्व जिल्ह्यांना हवामान खात्याकडून येलो अलर्ट देण्यात आला आहे.
तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यामध्ये मध्यम पावसाचा अंदाज असून हलक्या सरी कोसळतील अशी शक्यता आहे. याव्यतिरिक्त मराठवाड्यातील हिंगोली, बीड तसेच परभणी व नांदेड तसेच लातूर जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट आणि सोसायट्यांच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
विदर्भातील नागपूर, वाशिम तसेच वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये देखील वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे व या जिल्ह्यांना हवामान खात्याने येलो अलर्ट दिलेला आहे. तसेच या व्यतिरिक्त विदर्भातील भंडारा व अकोला तसेच अमरावती या ठिकाणी रिमझिम पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.