Agri Related Business:- शेती करत असताना शेतीशी आधारित किंवा शेतीशी निगडित असलेले व्यवसाय शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याचे ठरतात. कारण असे व्यवसाय शेतकरी शेती करत असताना कमीत कमी भांडवल गुंतवणूक करून सुरू करू शकतात व या माध्यमातून चांगली आर्थिक प्राप्ती देखील मिळवू शकतात. शेतीशी निगडित असलेल्या व्यवसायांची यादी पाहिली तर ती भरपूर मोठी आहे.
त्या माध्यमातून तुम्ही अनेक प्रकारचे शेतीशी संबंधित असलेले जोडधंदे करू शकतात किंवा शेती मालावर आधारित प्रक्रिया उद्योगांच्या माध्यमातून देखील तुम्हाला चांगले उद्योग उभारता येतात व यशस्वी होता येते. याच व्यवसायांच्या यादीमध्ये जर आपण नर्सरी अर्थात रोपवाटिका व्यवसायाचा विचार केला तर हा व्यवसाय देखील आर्थिक प्राप्तीच्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे व महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये हा व्यवसाय खूप झपाट्याने विस्तारत आहे.
कारण सध्या भाजीपाला व फळबाग लागवडीसाठी खूप मोठी संधी शेतकऱ्यांकडे असून शासनाच्या माध्यमातून देखील फळबाग लागवडीकरिता प्रोत्साहन देण्याकरिता योजना राबवल्या जात असल्याने येणाऱ्या काही दिवसात फळबाग लागवडीला खूप मोठ्या प्रमाणावर वेग येण्याची शक्यता आहे व त्या दृष्टिकोनातून रोपवाटिका व्यवसायामध्ये एक मोठी संधी आहे.
समाजामध्ये आपण अनेक शेतकरी पाहिले असतील की ते रोपवाटिका व्यवसायाच्या माध्यमातून यशस्वी झालेले आहेत. हा व्यवसाय शेतकरी बंधू अगदी सहजरित्या करू शकतात. रोपवाटिका व्यवसाय सुरू करण्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला त्याचा परवाना अर्थात लायसन्स घेणे गरजेचे असते.
कारण महाराष्ट्र रोपवाटिका अधिनियम 1976 अंतर्गत या उद्योगाचे नियमन व विकास करणारा कायदा अस्तित्वात आहे व या कायद्याच्या माध्यमातूनच राज्यामध्ये असणाऱ्या सर्व रोपवाटिकांना किंवा नवीन रोपवाटिका सुरू करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना हा परवाना घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे या लेखांमध्ये आपण नर्सरी अर्थात रोपवाटिका व्यवसायासाठी आवश्यक असणारा परवाना काढण्याची प्रक्रिया कशी आहे? याबद्दल महत्वपूर्ण माहिती बघणार आहोत.
रोपवाटिका व्यवसायासाठी परवाना मिळवण्याकरिता आवश्यक प्रक्रिया
जर तुम्हाला रोपवाटिका सुरू करायची असेल तर तुम्हाला वैयक्तिक रित्या कलमे किंवा रोपे विकण्यासाठी अर्ज करावा लागतो व ही कलमे किंवा रोपे तुम्ही कोणत्या ठिकाणी विकणार आहात ते अधिकार क्षेत्र निश्चित करावे लागते व ते करून संबंधित उपविभागीय कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा लागतो. त्यानंतर आवश्यक अर्ज भरून त्यासोबत आवश्यक कागदपत्रे जोडून व लागणारे शुल्क भरून हा अर्ज कृषी विभागाकडे जमा करावा लागतो.
ऑनलाइन पद्धतीने करता येईल नोंदणी
तुम्हाला रोपवाटिका परवाण्याकरिता अर्ज करायचा असेल तर तुम्ही तो ऑनलाइन पद्धतीने देखील करू शकता. याकरिता तुम्हाला…
1-https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en या पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने कलमे किंवा रोपे विकण्यासाठी लागणाऱ्या परवाना करता अर्ज करता येतो.
2- या पोर्टल वर गेल्यानंतर कलम किंवा रोपे विकण्याचा परवाना अर्ज करण्याकरिता ऑनलाइन प्लांट नर्सरी रजिस्ट्रेशन ऑनलाइन अर्ज करा या बटणावर क्लिक करावे लागते.
3- त्यानंतर नवीन वापरकर्ता नोंदणी करण्यासाठी न्यू रजिस्ट्रेशन वर क्लिक करावे लागेल.
4- त्यानंतर आवश्यक माहितीसह नोंदणी फॉर्म भरावा लागतो व पोर्टलवर लॉगिन करून तुम्हाला कलम किंवा रोपे विकण्याच्या परवान्यासाठी ऑनलाईन अर्ज करता येतो.
5- याकरिता डाव्या बाजूला जो काही मेनू असतो त्यावरून एग्रीकल्चर हा पर्याय निवडावा.
6- त्यानंतर कृषी विभागाचे संकेतस्थळ ओपन होते व यामध्ये असलेल्या पर्यायांपैकी हॉर्टीकल्चर हा पर्याय निवडावा त्यामध्ये नर्सरी लायसन्स नावाच्या पर्यावर क्लिक करावे.
7- या ठिकाणी क्लिक केल्यानंतर ऑनलाईन प्लांट नर्सरी रजिस्ट्रेशन असा फॉर्म ओपन होतो व हा फॉर्म योग्यरीत्या भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करून सबमिट करणे गरजेचे असते.
8- त्यानंतर परवाण्याकरिता तुम्हाला काही शुल्क भरावे लागते व तुम्ही ते ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करू शकतात.
9- या प्रक्रियेनंतर तुमच्या अर्जाचे पुनरावलोकन केले जाते व मंजुरी दिली जाते. मंजुरी मिळाल्यानंतर तुम्हाला कलम किंवा रोपे विकण्याचा परवाना प्राप्त होतो.