Soyabean Farming : कोपरगाव तालुक्यात अनेक भागात सोयाबीन पिकांवर पिवळ्या मोझॅकचा (केवडा) प्रादुर्भाव दिसून येत आहे. या घटनेत शेतकरी मात्र हतबल झाला आहे. शेतकऱ्यांनी आपले सोयाबीन पीक चांगले आणुन देखील या रोगांमुळे उत्पादनात घट होणार असल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले. सर्व विषयांबाबतची परिस्थिती शेतकऱ्यांनी कृषी मंत्र्याच्या निदर्शनास आणून दिली.
सदर निवेदनाची दखल घेवून कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी कृषी विभागातील अधिकारी यांना बांधावर जाऊन शेतकऱ्यांना रोगाची ओळख व व्यवस्थापन कसे करावे. या बाबतच्या सुचना दिल्याची माहिती कोपरगाव तालुका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आकाश नागरे यांनी दिली.
याबाबत दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, तालुक्यात कोपरगाव, सुरेगाव, दहेगाव, रवंदे, पोहेगाव, असे एकूण पाच महसूल मंडळ आहेत. या मंडळात २५ हजार ४९५ हेक्टर सोयाबीनचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जात आहे.
पडलेल्या पाऊसामुळे शेतकऱ्यांना समाधानाचे वातावरण असताना दुसरीकडे सोयाबीन पिकांवर मोझॅक (केवडा ) या रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. यावर्षी चांगला पाऊस पडेल या पार्श्वभूमीवर शेतकरी उत्साहात होता.
अशाच पावसाने धोका दिला आणि मृग नक्षत्रासह सुरुवातीस नक्षत्र कोरडी केल्याने शेतकऱ्यांची पीक मागे पुढे झाले. आधुन मधून आलेल्या पावसाने पीक निघाले आणि पिकांची वाढ झाली आता पिकाला फुलार आणि शेंगा पकडण्याचा कालावधी सुरू आहे. मात्र याच कालावधीत पीक पिवळे पडून भाजल्यासारखे दिसू लागले आहे.
एवढ्या मोठ्या प्रमाणात बी बियाणे, रासायनिक खते, मशागत मजुरीवर शेतकऱ्यांचे लाखो रुपये खर्च होत असून शेतकरी आर्थिक अडचणीत व कर्जबाजारी होत आहे. कृषी अधिकारी यांनी शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन केल्यास निश्चितच शेतकऱ्यांना मोठा आधार होणार असल्याचे आकाश नागरे यांनी सांगितले.