Ahmednagar Politics :- राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली. त्यानंतर अनेक आमदार अजित पवारांच्या गटात गेले. परंतु अहमदनगरमधील आमदार प्राजक्त तनपुरे मात्र शरद पवारांशी एकनिष्ठ राहिले. परंतु अचानक मंगळवारी तनपुरे हे देवगिरी बंगल्यावर अजित पवारांना भेटण्यासाठी गेले.
त्यावेळी देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातील नेत्यांची बैठक होती. त्याचवेळी ते तेथे गेल्याने चर्चांना उधाण आले आहे. परंतु यावेळी तनपुरे आणि अजित पवारांची भेट झाली नाही असे सांगितले जात आहे.
झाल्या घटनेवर प्राजक्त तनपुरेंनी प्रतिक्रिया देत स्पष्टच सांगितलं की, मुंबई येथे मंगळवारी सायंकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटण्यासाठी देवगिरी बंगल्यावर गेलो होतो. तेथे त्यांची बैठक असेलही पण त्यासाठी मी गेलेलो नव्हतो.
मतदारसंघातील विविध विकासकामांची निवेदने घेऊन गेलो होतो. परंतु, उपमुख्यमंत्री पवार यांची भेट झाली नाही असाही त्यांनी सांगितलं आहे.
अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री आहेत. मतदारसंघातील अनेक विकासकामे निधीअभावी प्रलंबित आहेत. पवार त्यादिवशी सायंकाळी देवगिरी बंगल्यावर भेटणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर मी विकासकामांचे निवेदन घेऊन त्यांच्याकडे गेलो. त्यांनी बोलावलेल्या बैठकीशी माझा काहीही संबंध नाही.
मी त्यांच्या बैठकीला गेलो नाही. मतदार संघातील विकासकामांसाठी निधी मागणे हे लोकप्रतिनिधी या नात्याने माझे काम आहे. मात्र, पवार यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यामुळे त्यांची व माझी भेट झाली नाही. – आमदार प्राजक्त तनपुरे