खाजगी सावकारांच्या जाचास कंटाळून तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील कात्रड येथे घडली. मयत तरुणाचा भाऊ प्रदीप भाऊसाहेब तांबे (वय- 3८ रा, कात्रड) याने याबाबत फिर्याद दिली आहे. मयत प्रमोद ऊर्फ संदीप भाऊसाहेब तांबे याने खाजगी सावकाराकडून सहा लाख रुपये घेतले होते.
मुद्दल व व्याजाची रक्कम परतफेड करूनही आरोपी सावकारांनी वेळोवेळी व्याजाच्या पैशाच्या मागणीसाठी तगादा लावला. आरोपींनी २८ सप्टेंबर २०२३ रोजी प्रमोद याच्या घरी जाऊन त्याची चौकशी केली. तो घरी नसल्याचे त्याच्या आईने सांगितले.
त्यानंतर प्रमोद हा गायब झाला. त्याचा मोबाइल बंद होता. त्याचा सर्वत्र शोध घेतला. परंतु, तो सापडला नाही. 30 सप्टेंबर २०२३ रोजी वांबोरी पोलीस चौकीत प्रमोद हरविल्याची तक्रार दाखल केली. १ ऑक्टोबर २०२३ रोजी पहाटे सव्वापाच वाजता प्रमोदने त्याचा चुलत भाऊ रमेश तांबे याच्या मोबाइलवर औषध घेऊ की, फाशी घेऊ, असा मेसेज पाठविला.
चुलत भावाला फोनवर पोहीच्या रस्त्याने यायला सांगितले. त्याच दिवशी सकाळी सव्वासहा वाजेदरम्यान प्रमोद ऊर्फ संदीप आऊसाहेब तांबे याने कात्रड शिवारात शेतातील बांधावरील चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत आरोपी अजित रमेश दांगट (रा. कात्रड) व किशोर तुकाराम शिंदे (रा. चेडगाव) या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.