Agricultural News : शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी येथील प्रयोगशील शेतकरी रविंद्र रायभान मडके यांनी आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून व वेगवेगळे प्रयोग करत योग्य नियोजन करून अतिशय कमी खर्चात घेतलेले कपाशी पीक सध्या चांगलेच बहरले आहे.
यावर्षी सुरुवातीपासूनच पावसाने फिरवलेली पाठ, सर्वत्र दुष्काळाचे सावट त्यातच शेतीचा वाढलेला खर्च, आर्थिक अडचणीमुळे शेतकरी मेटाकुटीला व पूर्णवेळ शेतात राबूनही अपेक्षित उत्पन्न होत नाही.
या सर्व गोष्टींवर मात करून आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून रविंद्र मडके यांनी कपाशीच्या एका वाणाची दोन एकर क्षेत्रावर लागवड केली, प्रायोगिक तत्वावर नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून रासायनिक खतांना फाटा देत
दहिगाव – ने कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. शामसुंदर कौशिक व दत्त कृषी सेवा केंद्र शहरटाकळीचे संचालक बाबासाहेब दगडे, राकेश पाटील व शेती तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने सुरुवातीपासूनच कपाशी पिकास सेंद्रिय खतांच्या तीन मात्रा दिल्या तसेच योग्य वेळी फवारणी करून व गरजेनुसार पाणी देऊन बोंडआळी, लाल्या रोगावर नियंत्रण मिळवले.
सध्या कपाशीच्या झाडांची उंची साडेपाच ते सहा फूट असून, हे बहरलेले कपाशी पीक पाहण्यासाठी अनेक शेतकरी भेटी देत आहेत. या वेळी सामाजिक कार्यकर्ते वाय. डी. कोल्हे, रामचंद्र गिरम, मेजर रमेश नरवडे, श्रीराम काकडे, दत्त कृषी सेवा केंद्राचे बाबासाहेब दगडे, मोहनराव खंडागळे, संजय खंडागळे, प्रयोगशील शेतकरी रविंद्र मडके, ताराचंद शिंदे, सखाराम जवादे आदी उपस्थित होते.
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत तसेच शेती तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेत शेती केल्यास कमी खर्चात विक्रमी उत्पादन मिळवता येते. रविंद्र मडके यांना शेतीची करण्याची आवड असून, ते आपल्या शेतात विविध प्रयोग करतात. इतर शेतकऱ्यांनाही हे प्रयोग प्रेरणादायी ठरावे, असा त्यांचा खटाटोप असतो.