Ahmednagar News :- महाराष्ट्रातील राजकीय स्थिती सर्वाना माहितच आहे. शिवसेना फुटल्यानंतर राष्ट्रवादीतही फूट पडली. राष्ट्रवादीचा विचार केला तर अहमदनगर जिल्ह्यात राष्ट्रवादीचे आजवर जास्त वर्चस्व राहिले आहे. परंतु आता राष्ट्रवादीतील फुटीनंतर आ. प्राजक्त तनपुरे व रोहित पवार सोडले तर बाकी राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार गटात गेले.
शिवसेनेचेही प्राबल्य कमीच झाले. परंतु आता अहमदनगरच्या राजकारणात सुप्रिया सुळे सक्रिय झाल्यात. अजित दादांसह विरोधकांचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करण्यासाठी त्या स्वतः मैदानात उतरतील अशी शक्यता आता निर्माण झालीये.
काल त्या अहमदनगरमध्ये होत्या. यावेळी त्यांनी भेटीगाठींवर भर दिला. महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक त्यांनी घेतली. या बैठकीत त्यांनी विरोधकांना थेट इशारा दिला. त्या म्हणाल्या की, आपण सर्व आता निवडणुकीच्या ऍक्शन मोडमध्ये आहोत.
अहमदनगर हा मोठा जिल्हा असून या जिल्ह्यात महाविकास आघाडीचा मोठा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्याचे नियोजन तुम्ही सर्वजण करा. या मेळाव्याला काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित राहिले पाहिजेत असेही त्या म्हणाल्या.
जिल्ह्यातील तिन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना एकत्र येऊन आपली ताकद वाढवावी लागणार आहे. देशात सत्ताधारी सरकार आहे ते हुकूमशाही सरकार आहे. देशातील सरकारने नेहमीच मराठी माणसाचा अपमान केला आहे. राज्यात सर्वत्र आरक्षणाची मागणी होत असताना सरकार त्यात लक्ष घालत नाहीत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साधी त्या गावांना भेटही दिली नाही असे त्या म्हणाल्या. पुढे त्या म्हणाल्या की राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेना यांनी एकत्र राहावं, कोणताही वरिष्ठ नेता आली की तीनही पक्षांच्या नेत्यांनी एकत्र येत भेटावं. कारण आपल्याला एकजूट दाखवायची आहे. व 2024 ला सर्व विरोधकांचा ‘करेक्ट’ कार्यक्रम करायचा आहे.
एकंदरीतच सुप्रिया सुळे या आता राजकारणावर स्वतः लक्ष देण्यास सज्ज झाल्या आहेत. याआधी अजित पवार यांचा नेहमीच दौरा असायचा पण आता सुप्रिया सुळे स्वतः आल्या व भेटीगाठी घेत बैठका देखील घेतल्या त्यामुळे आता अहमदनगरच्या ‘राज’कारणात स्वतः सुप्रिया सुळे लक्ष घालतील असे दिसत आहे.