महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून समाजातील अनेक घटकांकरिता वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवल्या जात असून समाजातील सर्व घटकांचे आर्थिक व सामाजिक दृष्टिकोनातून विकास व्हावा हा या मागचा शासनाचा उद्देश आहे. जर आपण राज्य शासनाच्या अनेक योजनांचा विचार केला तर या कृषी क्षेत्र तसेच व्यवसाय उभारण्यासाठी आवश्यक भांडवल उभारणी, अनेक प्रकारच्या शैक्षणिक योजनांचा अंतर्भाव यामध्ये आपल्याला करता येईल.
अगदी याच अनुषंगाने आता महाराष्ट्र राज्य शासनाने राज्यातील गरीब कुटुंबातील ज्या काही मुली आहेत त्यांचे सक्षमीकरण व्हावे या दृष्टिकोनातून लेक लाडकी ही योजना राबवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जर आपण लेक लाडकी या योजनेचा विचार केला तर या माध्यमातून मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देणे व त्यांचा जन्मदर वाढवणे तसेच मुलींचे शिक्षण डोळ्यासमोर ठेवून शिक्षणाला प्रोत्साहन देणे व मृत्यू दर कमी करणे, बालविवाह रोखणे व कुपोषणासारख्या गंभीर समस्या कमी करणे असे महत्त्वाचे उद्देश या योजनेमागे आहेत.
राज्यातील पिवळे व केशरी रेशन कार्डधारक कुटुंबात ज्या काही मुलींचा जन्म झालेला आहे त्या मुलींना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये जाहीर केल्याप्रमाणे माझी कन्या भाग्यश्री ही योजना आता अधिक्रमित करण्यात आली असून एक एप्रिल 2023 नंतर जन्म झालेल्या मुलींसाठी ही नवीन योजना राबविण्यात येणार असून एक एप्रिल 2023 पूर्वी एक मुलगी किंवा मुलगा आणि त्यानंतर दुसरी मुलगी किंवा जुळ्या मुली जन्माला आल्यास त्यांना देखील या योजनेचा लाभ आता मिळणार आहे. महत्वाचे म्हणजे जुळ्या दोन्ही मुलांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.
कुणाला मिळणार या योजनेचा लाभ?
पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबामध्ये जन्म झालेल्या मुलींना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजना अंतर्गत मुलीचा जन्म झाल्यानंतर पाच हजार रुपये, जेव्हा मुलगी पहिलीत जाईल तेव्हा 6000 रुपये, सहावीत गेल्यावर सात हजार, अकरावीत गेल्यावर आठ हजार रुपये आणि वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यावर 75 हजार रुपये असा एकूण लाभ एक लाख एक हजार रुपये इतका मिळणार आहे.
तसेच महत्वाचे म्हणजे शासनाच्या माध्यमातून डीबीटी म्हणजेच थेट लाभार्थी हस्तांतरणद्वारे लाभाची रक्कम लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे. एक एप्रिल 2023 नंतर कुटुंबात जन्मणाऱ्या एक अथवा दोन मुलींना त्याचप्रमाणे एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी जुळी अपत्ये जन्माला आल्यास एक मुलगा किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ मिळेल.
काय आहे अट?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी मात्र आई किंवा वडिलांना कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील. एक एप्रिल 2023 पूर्वी एक मुलगी किंवा मुलगा आणि त्यानंतर दुसरी मुलगी किंवा जुळ्या मुली जन्माला आल्यास त्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. जुळ्या दोन्ही मुली असतील तर त्यांना स्वतंत्रपणे या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.
लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयापेक्षा जास्त नसावे. योजनेची अंमलबजावणी एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालयामार्फत करण्याकरिता पोर्टल तयार करून त्यासाठी या योजनेतील लाभार्थ्यांची पोर्टलवर नोंदणी होऊन योजना सुरळीत कार्यान्वित राहण्याकरिता आयुक्तालय स्तरावरील कक्ष निर्माण करण्यात येणार आहे.
लेक लाडकी योजनेत नोंदणी कशी करावी?
महाराष्ट्र लेक लाडकी योजनेची रजिस्ट्रेशन प्रोसेस काय आहे? असा प्रश्न बऱ्याच जणांना पडलेला आहे. परंतु आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की या योजनेसाठी नोंदणी कशी करायची याबद्दलची अधिकृत माहिती महाराष्ट्र शासनाकडून जारी करण्यात आलेले नाही. जेव्हा लेक लाडकी या योजनेची अधिकृत वेबसाईट जारी करण्यात येईल तेव्हाच या योजनेबद्दलची रजिस्ट्रेशन प्रोसेस माहिती होणे शक्य आहे.