मटका अड्ड्याचे वेशांतर करत फेसबुक लाईव्हव्दारे स्टिंग ऑपरेशन ! कॉंग्रेसचे किरण काळे आक्रमक

Ahmednagarlive24 office
Updated:
Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांसह मध्य शहरातील विद्यालयाजवळ असणाऱ्या मटका अड्ड्याचे स्वतः वेशांतर करत फेसबुक लाईव्हव्दारे स्टिंग ऑपरेशन केले.

यासाठी काळेंनी पायजमा, शर्ट, टोपी असा ग्रामीण पेहराव करत मटका लावला. त्याची पावती देखील मटका चालकाकडून घेतली. आपली ओळख लपवण्यासाठी त्यांनी तोंडाला पंचा गुंडाळला होता. हा प्रसंग व्हिडिओमध्ये कैद झाला असून समाज माध्यमांवर तो चांगलाच व्हायरल होत आहे.

मुलांच्या उज्वल भवितव्यासाठी शहरातील सर्वांनीच हेरंब कुलकर्णी होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना काळे यांनी केले.

यावेळी काळे यांच्यासह कार्यकर्त्यांनी मी हेरंब कुलकर्णी असे लिहिलेल्या टोप्या परिधान करत मुलांचे भवितव्य खराब करण्यासाठी कारणीभूत असणाऱ्या पोलीस व मनपा प्रशासनाचा निषेध केला. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि मुख्याध्यापक हेरंब कुलकर्णी यांच्यावर शाळेच्या परिसरातील अवैध धंद्यांच्या टपऱ्या हटवण्याच्या तक्रारीवरून भ्याड हल्ला झाला होता.

काळे यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांसह त्यांची बुधवारी भेट घेऊन विचारपूस केली. त्यानतंर गुरुवारी दुपारी हे स्टिंग ऑपरेशन करण्यात आले. यावेळी शहरातील शाळेच्या प्रवेशद्वारापासून मटक्याच्या टपरीपर्यंतचे अंतर टेपने मोजले असतात ते केवळ ३० मीटर भरले.

केंद्र शासनाच्या २००३ च्या कायद्यानुसार आणि महाराष्ट्र शासनाच्या २०११ च्या जीआर नुसार कोणत्याही शाळा, महाविद्यालयांच्या प्रवेशद्वारापासून शंभर मीटरच्या आतमध्ये अवैध धंद्यांना अटकाव करण्यात आला आहे.

हे अंतर मोजल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, कोतवालीचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधत त्यांना रेड करण्याची मागणी काळेंनी केली. पोलिसांच्या पथकाने छापा टाकला.

यावेळी पोलीसांनी आरोपींना अटक करत मुद्देमाल जप्त केला. मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांना देखील तातडीने सदर मटक्याच्या अतिक्रमित टपरीवर कारवाईची मागणी काळेंनी फोनव्दारे केली.

यावेळी संजय झिंजे, अनिस चुडीवाला, दशरथ शिंदे, उषाताई भगत, सुनीताताई भाकरे, आकाश आल्हाट, विलास उबाळे, सोफियान रंगरेज, विकास भिंगारदिवे, किशोर कोतकर, अभिनय गायकवाड, सुजित क्षेत्रे आदींसह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe