Ahmednagar News : श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भंगार दुकानांमध्ये भंगार खरेदी-विक्रीच्या नावाखाली उभारलेल्या दुकानामध्ये चोरीच्या दुचाकी, चारचाकी वाहने, तसेच शेतकऱ्यांची विद्युत मोटारी नष्ट केली जात असल्याची मोठी चर्चा असून,
याकडे पोलिस प्रशासनाने दुर्लक्ष केले की काय? असा प्रश्न निर्माण होत असतानाच कारवाईस टाळाटाळ का करत आहेत. याबाबत नागरिक अनेक तर्कवितर्क लावत आहेत.
तालुक्यातील बेलवंडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अनेक छोट्या मोठ्या गावांमध्ये परप्रांतीय नागरिकांनी बाहेरून येऊन भंगार विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. यासाठी त्यांनी महागड्या जागा खरेदी केल्या आहेत तर काही ठिकाणी स्थानिक नागरिकांच्या आशीर्वादाने त्यांच्या जागेत दुकानासाठी मोठी शेड उभारून दुकाने थाटली आहेत.
या दुकानांमध्ये अत्याधुनिक पद्धतीच्या यंत्रसामुग्रीच्या सहाय्याने चोरीच्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांना नष्ट करून विकले जात आहे. या व्यवसायातून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असते.
जुनी असणारी वाहने नष्ट करून त्याचे भंगार करून विकले जावे, अशी अपेक्षा असताना मात्र काही दुकानात तर चक्क चोरीच्या वाहनांचा वापरही मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याची चर्चा आहे.
भंगारात आलेली वाहने नष्ट करण्याअगोदर परिवहन खात्याच्या अधिकाऱ्यांची परवानगी घेणे क्रमप्राप्त आहे. मात्र, अशा प्रकारची परिवहन विभागाची कुठलीही परवानगी न घेता नियम धाब्यावर बसवून परिवहन विभागाच्या नाकावर टिचून भंगार दुकानचालक खुलेआम हा व्यवसाय होत असल्याची चर्चा आहे.
तसेच परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या चोरी जाणाऱ्या विद्युत मोटारींची तसेच तांब्याच्या केबलची देखील या भंगार व्यावसायिकांकडून राजरोसपणे खरेदी-विक्री केली जात असल्याचे चित्र दिसून येत
असतानाच खरेदी केलेल्या विद्युत मोटारीं रात्रीतून खोलून त्यातील तांब्याच्या तारा एकत्र गोळा करून उर्वरित लोखंडी वस्तूचे भंगार करून त्याची विक्री केली जात असल्याची चर्चा जोरदार सुरू आहे.