किवी फळ विक्री आणि प्रक्रिया उद्योगातून हा शेतकरी कमावत आहे महिन्याला लाखो रुपये! वाचा या शेतकऱ्याची यशाची कहाणी

Ajay Patil
Published:

शेतीमध्ये व्यावसायिक दृष्टिकोन मोठ्या प्रमाणावर रुजला असून उदरनिर्वाह पुरती  शेती ही संकल्पना कधीच मागे पडलेली आहे. तसेच आधुनिक तंत्रज्ञानाची जोड आणि वेगवेगळ्या पिकांची लागवड या जोरावर शेतकरी आता खूप मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेऊ लागले आहेत व चांगल्या प्रकारचे आर्थिक समृद्धी देखील मिळवत आहेत. तसेच बरेच शेतकरी आता अनेक शेती आधारित प्रक्रिया उद्योगांमध्ये उतरले असून शेतीसोबत अशा उद्योगांच्या माध्यमातून इतर व्यक्तींना रोजगार निर्मिती करण्याच्या दृष्टिकोनातून देखील खूप महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडत आहेत.

याच पद्धतीने जर आपण उत्तराखंड राज्यातील बागेश्वर मधील भवन सिंग कोरंगा या शेतकऱ्याचा विचार केला तर यांनी देखील पारंपारिक शेतीला फाटा देत नवीन पिकांची लागवड सुरू केली व त्या माध्यमातून खूप चांगला नफा मिळवला आहे. भवन सिंग कोरंगा हे किवी या फळशेतीतून भरघोस असा आर्थिक नफा मिळवत आहेत. एवढेच नाही तर किवी फळावर प्रक्रिया उद्योग उभारला असून या माध्यमातून देखील त्यांनी अनेक लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.

 भवन सिंग कोरंगा यांची यशोगाथा

उत्तराखंड राज्यातील मूळचे बागेश्वर मधील शमा या परिसरामध्ये राहणारे भवन सिंग कोरंगा हे एक प्रगतिशील शेतकरी असून बागेश्वर जिल्ह्यामध्ये त्यांची शेती आहे व या ठिकाणी त्यांनी किवी फळ शेतीतून भरघोस आर्थिक उत्पन्न मिळवायला सुरुवात केलेली आहे.

हळूहळू त्यांचे वार्षिक उत्पन्न आता लाखो रुपयांवर पोहोचले असून स्वतःच्या आर्थिक प्रगती शिवाय त्यांनी किवी फळ शेतीतून अनेक लोकांना रोजगार देखील उपलब्ध करून दिला आहे. जर आपण बागेश्वर जिल्ह्यातील शामा या परिसराचा विचार केला तर हे किवीचे एक सेंटर पॉईंट म्हणजेच केंद्र म्हणून देखील ओळखले जाते.

ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी शमा व लेती या परिसरातील शेतकऱ्यांनी पिकवलेली किवी बाजारामध्ये विक्रीसाठी उपलब्ध होते व महत्त्वाचे म्हणजे या भागातील किवी फळ अतिशय स्वस्तात उपलब्ध होते. महत्त्वाचे म्हणजे या भागातील किवी फळ उत्पादनाचे सगळे श्रेय सेवानिवृत्त प्राचार्य भवन सिंग कोरंगा यांना जाते.

त्यांचा किवी फळशेतीतील प्रवास पाहिला तर साधारणपणे 2008 मध्ये त्यांनी किवी शेतीमध्ये प्रवेश केला व आज ते बागेश्वर जिल्ह्यातील प्रमुख किवी उत्पादकांपैकी एक शेतकरी आहेत. महत्त्वाचे म्हणजे किवी फळाचे उत्पादन कसे घ्यावे याचे संपूर्ण प्रशिक्षण ते इतर शेतकऱ्यांना देखील देतात. आज त्यांच्याकडे किवीच्या तीनशे वेली असून दरवर्षी अनेक क्विंटल किवी बाजारपेठेत विकली जाते. जर आपण किवी फळाचा बाजारातील दर पाहिला तर हा दर्जेनुसार ठरतो व 50 ते 200 रुपये किलो असा दर मिळतो.

 भवन सिंग कोरंगा किवी फळावर करतात प्रक्रिया

भवन सिंग यांच्या सोबतच इतर शेतकऱ्यांनी देखील लेटी व शमा या परिसरामध्ये किवीचे उत्पादन घ्यायला सुरुवात केली असून या दृष्टिकोनातून भवनसिंग यांनी गावांमध्येच अन्नप्रक्रिया युनिट उभारले आहे व या माध्यमातून ते वेगवेगळ्या प्रकारचे किवी फळाचे ज्यूस आणि कँडी तयार करतात बाजारपेठेमध्ये त्याची विक्री करून प्रत्येक महिन्याला लाखोंची कमाई करत आहे.

 किवी रोपवाटिकेतून देखील लाखोंची कमाई

किवी फळ विक्रीच नाही किंवा किवी प्रक्रिया उद्योगच नाही तर ते किवी फळाच्या रोपवाटिकेच्या माध्यमातून देखील लाखो रुपये कमवतात. भवन सिंग कोरंगा यांची किवी फळाची रोपवाटिका असून सध्या या रोपवाटिकेमध्ये दहा हजार किवीची रोपे आहेत. त्यामध्ये कलम केलेली रोपे ते 275 रुपयांना विकतात तर सामान्य पद्धतीने तयार केलेली रुपये 225 रुपये प्रतिरोप याप्रमाणे विकतात. एकट्या किवीच्या रोपवाटिकेच्या व्यवसायातून त्यांना लाखो रुपयांचे उत्पन्न मिळत आहे.

 या पद्धतीने भवान सिंग कोरंगा यांच्या उदाहरणावरून दिसून येते की एकाच पद्धतीच्या पिकाच्या लागवडीतून अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय सुरू करता येतात व लाखो रुपयांची कमाई करता येते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe