मुंबई शासनमान्य वस्तूंची वाहतूक करणार्या साधंनांना सवलत पास दिले आहेत. अत्यावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण होवू नये हा त्यामागचा उद्देश आहे.
परंतु या पासचा दूरपयोग करत अत्यावश्यक सेवेचा पास चिकटवत त्यातून गुटखा विक्रीसाठी आणला जात असल्याचा धक्कादायक प्रकार मुंबई पोलिसांनी उघडकीस आणला आहे.
ही कारवाई बुधवारी साकीनाका परिसरात गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कक्ष १० ने केली. आकाश गुप्ता (२८) या आरोपीस अटक करण्यात आले असून तो साकीनाक्याच्या मोहाली व्हिलेजचा राहणारा आहे.
त्याच्याकडून ८ लाख ८० हजार रुपयांचा गुटखा ३ लाखांच्या टेम्पोसह हस्तगत करण्यात आला.
अत्यावश्यक वस्तू आणि अन्नपदार्थांचा पुरवठा करण्याच्या उद्देशाने शासनाकडून काही लोकांना तात्पुरत्या स्वरूपात विशेष पास उपलब्ध करून दिले आहेत.
मात्र त्याचा गैरवापर करत गुटखाविक्रीसाठी आणण्यात येणार असल्याची माहिती कक्ष १०चे प्रमुख सुनील माने यांना मिळाली. त्यानुसार त्यांच्या पथकाने साकीनाक्यात सापळा रचत एकाला टेम्पोसह ताब्यात घेतले.