MLC Satyajeet Tambe : सत्यजीत तांबे म्हणजे ‘बाप से बेटा सवाई!’

Ahmednagarlive24
Published:

MLC Satyajeet Tambe :- डॉ. सुधीर तांबे यांचा पाच जिल्ह्यांमधील जनसंपर्क प्रचंड दांडगा आहे. लोकांसोबत त्यांचे संबंध आजही तेवढेच चांगले आहेत. पण संघटन कौशल्य, जनसंपर्क आणि समोरच्याला आपल्या वागण्यातून आपलंसं करण्याचा स्वभाव या बाबत आ. सत्यजीत तांबे म्हणजे बाप से बेटा सवाई आहेत, अशी प्रतिक्रिया दिंडोरी तालुक्यातील मतदारांनी व्यक्त केली.

आमदार झाल्यानंतर पहिल्यांदाच दिंडोरी तालुक्याच्या दौऱ्यावर आलेल्या सत्यजीत तांबे यांनी या दौऱ्यात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, डॉक्टर, वकील, पत्रकार यांच्या संघटनांसह विविध क्षेत्रांमधील मान्यवरांच्या भेटीगाठी घेतल्या. लोकांनीही ठिकठिकाणी त्यांचा सत्कार करत विविध मुद्द्यांवर त्यांच्याशी चर्चा केली.

आमदार सत्यजीत तांबे यांनी वणी येथील सप्तश्रुंगी देवीचे दर्शन घेऊन दौऱ्याची सुरुवात केली. दौऱ्यात तालुक्यातील दिंडोरी, वणी, खेडगाव, कादवा कारखाना अशा विविध ठिकाणी जात सत्यजीत तांबे यांनी शिक्षक, विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी, डॉक्टर, वकील, पत्रकार, स्थानिक लोकप्रतिनिधी अशा विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या गाठीभेटी घेतल्या.

तसंच त्यांनी नगर पंचायतीत जाऊन तेथील प्रतिनिधींशीही चर्चा करत त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या. या वेळी विविध संघटनांनी आ. तांबे यांचा सत्कार केला. निवडून आल्यानंतरही सातत्याने भेटीला येणारे आणि प्रश्नांची दखल घेणारे आमदार तांबे खऱ्या अर्थाने आमचे लोकप्रतिनिधी आहेत, अशी भावना या वेळी मतदारांनी व्यक्त केली.

तालुक्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या संघटनांशी चर्चा करत आमदार सत्यजीत तांबे यांनी शिक्षण क्षेत्रातील विविध समस्या जाणून घेतल्या. शिक्षक भरतीच्या प्रश्नाबाबतही या वेळी चर्चा झाली. त्याशिवाय वकिलांच्या बार असोसिएशननेही आमदार तांबे यांचा सत्कार केला.

दिंडोरी तालुक्यातील डॉक्टरांच्या संघटनेच्या प्रतिनिधींची भेटही आ. सत्यजीत तांबे यांनी घेतली. या प्रतिनिधींनीही पुष्पगुच्छ देत त्यांचं स्वागत केलं. आमदार सत्यजीत तांबे यांनी डॉक्टरांच्या संघटनांसोबत बैठक घेत त्यांच्याही समस्या जाणून घेतल्या. त्याशिवाय दिंडोरीच्या नगर पंचायतीत जात स्थानिक लोकप्रतिनिधींच्या मागण्या काय आहेत, कुठे निधीची आवश्यकता आहे, आदी गोष्टींची चाचपणीही आमदार तांबे यांनी केली.

लोकप्रतिनिधीने फक्त निवडणुकीच्या प्रचारापुरतं मतदारसंघात न जाता सातत्याने मतदारांच्या संपर्कात राहायचं असतं. तरुण आमदार सत्यजीत तांबे यांनी निवडून आल्यानंतर पहिल्या १०० दिवसांमध्येच सर्वेक्षण करून त्यांच्या कामाचं मूल्यमापन करण्याची संधी आम्हाला दिली. २०० दिवसांनंतरही त्यांनी असंच सर्वेक्षण केलं. विशेष म्हणजे आम्ही दिलेल्या प्रतिक्रियांचा त्यांनी गांभीर्याने विचार करत उपायही केले होते. आमचं प्रतिनिधित्त्व योग्य व्यक्तीच्या हाती आहे, अशी भावना या वेळी शिक्षकांनी व्यक्त केली.

गुरूमाऊलींचेही आशीर्वाद घेतले
दिंडोरी तालुका हा सप्तश्रुंगी देवीसाठी ओळखला जातो, त्याचप्रमाणे येथील श्री स्वामी समर्थ केंद्रही प्रसिद्ध आहे. आमदार सत्यजीत तांबे यांनी या केंद्राला भेट देत स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं. तसंच गुरूमाऊली अण्णासाहेब मोरे यांचे आशीर्वादही घेतले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe