Ahmadnagar Braking : पाथर्डी तालुक्यातील करंजी घाटाच्या पायथ्याशी सोमवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास दुधाचा टँकर व ट्रक यांची समोरासमोर धडक झाली. या अपघातामध्ये दोन जण ठार झाले तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की नगरकडून तिसगावकडे येत असलेला दुधाचा टँकर व पैठणकडून नगरकडे जात असलेल्या ट्रकची सोमवारी रात्री साडेबाराच्या सुमारास घाटाच्या पायथ्याशी समोरासमोर धडक झाली.

या अपघातामध्ये टँकर चालक शिवाजी नानासाहेब भवार (राहणार निवडूंगे तालुका पाथर्डी) व ट्रक मधील जावेद शेख (राहणार विहामांडवा तालुका पैठण) या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर ट्रक मधील ऋषिकेश मोटकर, गणेश गाभूर (राहणार विहामांडवा तालुका पैठण) हे गंभीर जखमी झाले आहेत.
या अपघातात टँकर व ट्रकचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. अपघात घडल्यानंतर नागरिकांनी व पाथर्डी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठवले.
अपघाताची मालिका संपण्याचे नाव घेईना. नुकत्याच काही घटना ताज्या असतानाच आता ही घटना घडली आहे. या घाटात अनेकदा अपघात होतात. वेगावर नियंत्रण नसणे, किंवा इतर देखील काही कारणे आहेत. त्यामुळे सर्वानी काळजी घेत वाहन वाहतूक करावी असे आवाहन प्रशासनाकडून नेहमीच करण्यात येते.