Ahmednagar News : मोटारसायकल चोरी करणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद ! ३० मोटारसायकल हस्तगत

Ahilyanagarlive24 office
Published:

Ahmednagar News : मोटारसायकल चोरी करणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले असून २२ लाख ८२ हजार रुपये किंमतीच्या ३० मोटारसायकल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आल्याची माहिती जिल्हा पोलिस अधिक्षक राकेश ओला यांनी दिली आहे.

अहमदनगर जिल्ह्यामध्ये मोटारसायकल चोरी करणाऱ्या चोरट्यांनी धुमाकुळ घातलेला होता. मोटारसायकल चोरी करणाऱ्या इसमांचा शोध घेवुन कारवाई करण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेला श्री. ओला यांनी आदेश दिले होते.

त्यानूसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांनी त्यांच्या पथकातील पोसई तुषार धाकराव, सफौ बाळासाहेब मुळीक, भाऊसाहेब काळे, पोहेकॉ अतुल लोटके, पोना रविंद्र कर्डीले, पोना गणेश भिंगारदे, पोना संदीप चव्हाण, पोना संतोष खैरे, फुरकान शेख, विजय ठोंबरे,

पोकॉ बाळासाहेब गुंजाळ, रणजित जाधव, चालक पोहेकॉ उमाकांत गावडे यांचे विशेष पोलीस पथक स्थापन करुन अहमदनगर जिल्ह्यातील मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याची माहिती घेवुन गुन्हे उघडकीस आणण्याबाबत पथकास सुचना व मार्गदर्शन करुन पथक रवाना केले होते.

पोलीस पथक शिर्डी परिसरामधील चोरीस गेलेल्या मोटारसायकल ठिकाणाची पाहणी करुन तसेच पोलीस स्टेशन अभिलेखाची खात्री करत असताना शिर्डी परिसरामधुन विशेषतः होंडा कंपनीच्या जास्त गाड्या चोरी झाल्याचे निदर्शनास आले.

त्यादृष्टीने अशाप्रकारे गुन्हे करणारे अहमदनगर तसेच आजुबाजुच्या जिल्ह्यामधील मोटारसायकल चोरीमधील आरोपीची माहिती काढत असतांना पोलीस पथकास गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, अन्वर मन्सुर शेख (रा. पानमळा, कोपरगांव) हा चोरीची मोटारसायकल घेवुन शिर्डी ते कोपरगांव जाणाऱ्या रोडवर सावळीविहीर फाटा या ठिकाणी थांबलेला आहे.

त्यानूसार पोलीस पथकाने सावळीविहीर परिसरामध्ये सापळा लावुन सदर इसमास ताब्यात घेतले. त्याच्याकडे चोरीच्या मोटारसायकलबाबत विचारपुस करता त्याने तसेच त्याचे इतर साथीदार बबन धोंडीराम मोगरे (रा. रावळगांव, ता. मालेगांव, जि. नाशिक),

शाहीस्ता मन्वर अली सय्यद (रा. कोपरगांव), माया दिनेश चौधरी (रा. शिर्डी), अंकुश भावसिंग चव्हाण (रा. रिठ्ठी मोहर्डा, कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर) यांच्यासह अहमदनगर, नाशिक, मालेगांव, परभणी या जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणावरुन मोटारसायकली चोरी केलेल्या असल्याची कबुली दिली. विविध ठिकाणावरुन २२ लाख ८२ हजार रुपये किंमतीच्या ३० दुचाकी या आरोपींकडून पोलिस पथकाने हस्तगत केल्या आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe