अहमदनगर ब्रेकिंग : विजेच्या धक्क्याने आजोबासह नातवाचा मृत्यू ! परिसरात हळहळ व्यक्त

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmadnagar Breaking

Ahmadnagar Breaking : रात्रीच्या वेळी शेतात कांद्याच्या रोपाला पाणी देताना विजेचा जोरदार धक्का बसल्याने नातू व आजोबाचा मृत्यू झाला. ही घटना शेवगाव तालुक्यातील वडुले खुर्द येथे सोमवार, दि. १६ रोजी पहाटेच्या सुमारास घडली.

निवृत्ती टोपा आव्हाड (वय ७८) व दीपक सोपान पाखरे (वय-२६), असे या घटनेतील मयत आजोबा व नातवाचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

याबाबत समजलेली हकीकत अशी की, वडुले खुर्द येथील कोपरे रस्त्यानजीक वस्तीवर राहणारे शेतकरी निवृत्ती आव्हाड शेतीपंपाना रात्रीचा वीजपुरवठा असल्याने कांद्याच्या रोपाला पाणी देण्यासाठी सोमवार, ता. १६रोजी पहाटे अडीचच्या सुमारास गेले होते.

मात्र, तेथून गेलेल्या वायरमधील विद्युतप्रवाह जमिनीवर पडलेल्या तारेत उतरल्याने त्यांना विजेचाजोरदार धक्का बसला, ते जोराने ओरडताच त्यांचा आवाज वस्तीवर गेला, तेव्हा त्यांच्या पत्नीने त्यांच्या मुलीचा मुलगा दीपक पाखरे यास झोपेतून उठवून शेतात जाऊन पाहण्यास सांगितले.

वीजप्रवाहाची कल्पना न आल्याने दीपक तेथे जाऊन आजोबांना उठविण्याचा प्रयत्न करत असताना त्यालाही विजेचा धक्का बसला. त्यातच दोघांचाही मृत्यू झाला. परिसरातील ग्रामस्थ व कुटुंबातील व्यक्ती तेथे आल्यानंतर वीजपुरवठा खंडित करण्यात आला.

मंगळवारी (दि.१७) या दोघांवरही शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत दिपक विवाहित असून, त्याच्यामागे पत्नी व मुलगी, असा परिवार आहे.

दरम्यान, शेतीपंपाना रात्रीच्या वेळी केल्या जाणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना अशा प्रकारे जोखीम पत्कारावी लागत असल्यामुळेच एकाच कुटुंबातील दोघांचा हकनाक बळी गेल्याची संतप्त भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe