Sarkari Yojana: अनेक प्रगतशील शेतकरी आता आपल्या पिकांवर प्रक्रिया करून स्वत: ते विकत आहेत. राजस्थान सरकार तर तेथील शेतकऱ्यांना कृषी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी बंपर सबसिडी देत आहे. या योजनेचा लाभ घेत शेतकरी समृद्धी करत आहे. राजस्थान कृषी प्रक्रिया, कृषी व्यवसाय आणि कृषी निर्यात प्रोत्साहन धोरणांतर्गत शेतकऱ्यांना कृषीआधारित उद्योग उभारणीसाठी 75 टक्के रक्कम देत आहे.
किती सबसिडी दिली जाणार
या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती-जमातीतील शेतकरी किंवा त्यांच्या संस्था व उद्योजकांना भांडवली खर्चासह नवीन कृषी प्रक्रिया युनिट उद्योग उभारण्यासाठी खर्चाच्या ७५ टक्के किंवा जास्तीत जास्त दीड कोटी रुपयांचे अनुदान दिले जात आहे. इतर पात्र उद्योजकांना खर्चाच्या ५० टक्क्यांपर्यंत किंवा दीड कोटी रुपयांपर्यंत अनुदान दिले जात आहे.

भांडवली अनुदानाबरोबरच प्रक्रिया प्रकल्प उभारल्यानंतर शेतकऱ्यांना कर्जावरील व्याजअनुदानही मिळणार आहे. जास्तीत जास्त १ कोटी रुपयांपर्यंतचे व्याज अनुदान 6 टक्के दराने देय आहे. तर इतर उद्योजकांना जास्तीत जास्त 50 लाख रुपयांपर्यंत 5 टक्के दराने अनुदान देण्यात येणार आहे.
व्यवसायाचा विस्तार करण्यास मदत
शेतकऱ्यांना त्यांचा व्यवसाय चालवण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्यांच्या उत्पादनाची पोहोच वाढवण्यासाठी अतिरिक्त प्रोत्साहन देण्यासाठी 5 वर्षांसाठी वीज शुल्कावर दरवर्षी 2 लाख रुपये मिळतात. सौरऊर्जा युनिट बसवण्यासाठी 10 लाख रुपयांचे अनुदान दिले जात आहे. याशिवाय शेतकऱ्यांना फळे आणि भाजीपाला निर्यातीसाठी 3वर्षांसाठी जास्तीत जास्त 10लाख रुपयांचे मालवाहतूक अनुदान दिले जात आहे. तसेच, नॉन ऑरगॅनिक प्रमाणित उत्पादनांच्या निर्यातीवर 5 वर्षांसाठी जास्तीत जास्त 20 लाख रुपये मालवाहतूक अनुदान दिले जाईल.
प्रक्रिया युनिट
या योजनेअंतर्गत फळे आणि भाजीपाला, मसाले, तृणधान्ये आणि इतर ग्राहक खाद्यपदार्थ, तेलबिया, कडधान्ये, औषधे, सुगंधी उत्पादने, मध आणि मशरूम यासह विविध कृषी आणि बागायती उत्पादनांसाठी प्रक्रिया युनिट आपण स्थापन करू शकता.