Ahmednagar Breaking : घरगुती वादातून पतीने पत्नीला मारहाण करून तिचा खून केल्याची घटना इंगळे वस्ती, रेल्वे स्टेशन येथे घडली. शिवानी ज्ञानेश्वर चौधरी (वय २५) असे मयत पत्नीचे नाव आहे.
याप्रकरणी पती ज्ञानेश्वर सुरेश चौधरी याच्या विरूध्द कोतवाली पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. उषा निलेश राठोड (वय ४५ रा. आंबराई झोपडपट्टी, ता. कामठी, जि. नागपुर) यांनी फिर्याद दिली आहे.
उषा राठोड यांच्या सख्खा बहिणीची मुलगी शिवानी हिचा विवाह २ ऑगस्ट २०२३ रोजी ज्ञानेश्वर चौधरी याच्या सोबत नगर मधील एका मंदिरात झाला होता. विवाहनंतर शिवानी व ज्ञानेश्वर इंगळे वस्ती, रेल्वे स्टेशन येथील खंडारे यांच्याकडे भाड्याने राहत होते.
रविवारी (२२ ऑक्टोबर) सायंकाळी सात वाजता ज्ञानेश्वर याने उषा राठोड यांना फोन करून शिवानी मयत झाल्याची माहिती दिली. माहिती मिळताच उषा राठोड व त्यांचे इतर नातेवाईक नगर येथे येण्यासाठी निघाले.
ते सोमवारी (२३ ऑक्टोबर) नगर मध्ये पोहचले. त्यांनी शिवानीच्या मृत्यूबाबत येथील जिल्हा शासकीय रूग्णालयात चौकशी केली असता शिवानीचा मृत्यू तिच्या डाव्या गालावर व पाठीवर मारहाण केल्याने अंतर्गत रक्तस्त्राव होऊन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
फिर्यादी राठोड यांनी अधिक माहिती घेतली असता त्यांना समजले की, रविवारी (२२ ऑक्टोबर) सायंकाळी सातच्या पूर्वी शिवानी व तिचा पती ज्ञानेश्वर घरी असताना त्यांच्यात घरगुती कारणावरून वाद झाले
व ज्ञानेश्वर याने शिवानी हिला मारहाण करून जिवे ठार मारले. उषा राठोड यांनी याबाबत कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून ज्ञानेश्वर चौधरी विरूध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस करीत आहेत.