Parner News : आदर्श गाव हिवरेबाजारमध्ये नवरात्र उत्सवानिमित्त मुंबादेवी मंदिरात झालेल्या ग्रामसभेत सन २०२३ २४ चा पाण्याचा ताळेबंद मांडण्यात आला.
याप्रसंगी आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादाभाऊ गुंजाळ, शिक्षणाधिकारी भास्कर पाटील गटशिक्षणाधिकारी बाबुराव जाधव, सरपंच विमलताई ठाणगे, चेअरमन छबुराव ठाणगे आदी उपस्थित होते.
या वेळी पवार यांनी म्हणाले, सन १९९५ पासून आदर्श गाव हिवरे बाजार येथे पाण्याच्या ताळेबंदाच्या आधारे पिकांचे नियोजन केले जाते. पूर्वी फक्त १ पर्जन्यमापक होते; परंतु सन २००४ नंतर प्रत्येक पाणलोट क्षेत्रात स्वतंत्र पर्जन्यमापक बसविल्यामुळे अचूक पाण्याचा ताळेबंद येऊ लागला.
यावर्षी २२ दिवसांत एकूण ५३८ मी.मी. पाऊस झाला असून, त्यातून ५२५.१५ कोटी लिटर पाणी उपलब्ध झाले. त्यापैकी गावाच्या वापरासाठी ३५०.११ कोटी लिटर पाणी उपलब्ध असून, गावाच्या विविध वापरासाठी वार्षिक गरज ३३३.३२ कोटी लिटर आवश्यक असून,
त्यात माणसे व जनावरांना पिण्यासाठी आवश्यक ७.७१ कोटी लिटर, शेतीसाठी ३१८.६१ कोटी लिटर व इतर वापरासाठी ७ कोटी लिटर, अशी गरज असून, उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई येणार नाही,
यासाठी उन्हाळी सिंचन कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, उन्हाळ्यात फक्त जनावरांचा चारा व फळबाग जगविणे एवढेच उद्दिष्ट ठेवून भविष्यासाठी १६.८० कोटी लिटर पाणी राखीव ठेवण्यात येणार आहे.