कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन करण्यात आले. त्यानंतर अनेक कारखान्यातील परप्रांतीय मजूर त्यांच्या मूळ गावी निघून गेल्याने अनेक ठिकाणी श्रमिकांची गरज भासणार आहे.
यामुळे स्थानिक भूमिपुत्रांना नोकरीची संधी निर्माण झाली आहे. महाराष्ट्रातील उद्योगांमध्ये कामगारांची टंचाई निर्माण होऊ नये म्हणून उद्योग, कामगार व कौशल्य विकास विभागाच्या वतीने कामगार ब्युरोची स्थापना केली जाणार
असल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी गुरुवारी दिली. कामगार ब्युरो कामगारांच्या त्यांच्या कौशल्याप्रमाणे विभागणी करेल. त्यानंतर, अवघ्या सात दिवसांत कामगारांना प्रशिक्षण देऊन उद्योगांची गरज पुरविली जाणार आहे.
उद्योगांना कुशल, अकुशल मजूर, कामगार मोठ्या संख्येने उपलब्ध होतील. मराठी मुलांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन उद्योगमंत्री या नात्याने सुभाष देसाई यांनी केले आहे. महाराष्ट्राला ही एक संधी मिळाली आहे.
त्यामुळे आता उद्योजकांनी स्थानिक भूमिपुत्रांना प्रथम संधी द्यावी. यामुळे मराठी माणसांची महाराष्ट्रातील बेकारी कमी होईल’, असा विश्वास सुभाष देसाई यांनी व्यक्त केला आहे.