Farmer Success Story : ‘या’ शेतकऱ्याच्या जिद्दीला सलाम! दुर्धर आजाराशी झुंज देत यशस्वी केली केशरशेती,वाचा या शेतकऱ्याची यशोगाथा

Farmer Success Story

Farmer Success Story:- असे म्हणतात की माणसाच्या मनामध्ये जिद्द, मनात असलेली अफाट इच्छाशक्ती आणि ध्येय पूर्ण करण्यासाठी लागणारे सचोटी आणि सातत्य राहिले तर व्यक्ती कुठल्याही वयामध्ये आणि कोणत्याही परिस्थितीत ध्येय गाठतोच.

त्यातल्या त्यात जर शरीरामध्ये एखाद्या दुर्धर आजाराचा प्रादुर्भाव झालेला असेल तर दैनंदिन कामे करणे देखील जिकिरीचे होते. परंतु आपण असे अनेक उदाहरण ऐकले असतील किंवा पाहिले असतील की काही व्यक्ती अतिशय गंभीर अशा आजाराने ग्रस्त असतात परंतु शारीरिक समस्येवर मात करत ते एखाद्या क्षेत्रामध्ये यश मिळवतात.

या यशामागे त्यांचे कष्ट करण्याची तयारी आणि कुठल्याही परिस्थितीशी दोन हात करत मार्गक्रमण करण्याचा गुण खूप महत्त्वपूर्ण ठरतो. अगदी याच पद्धतीने जर आपण विचार केला तर तळेगाव येथील गौतम राठोड यांचा विचार केला तर कॅन्सर सारख्या आजाराने ग्रस्त असलेले आणि याच आजारामुळे किडनी देखील काढावी लागली असल्याने देखील त्यांनी मोठ्या कष्टाने एरोपोनिक पद्धतीने केशर शेती फुलवली आहे. त्यांचीच यशोगाथा आपण या लेखात बघणार आहोत.

दुर्धर आजाराशी झुंज देत फुलवली केशर शेती

याबाबत सविस्तर वृत्त असे की, गौतम राठोड हे तळेगाव येथील असून बीकॉम पर्यंत त्यांचे शिक्षण झालेले आहे. शिक्षण झाल्यानंतर त्यांनी तळेगाव या ठिकाणीच गॅरेजचा व्यवसाय सुरू केला. हा व्यवसाय देखील त्यांचा उत्तम पद्धतीने सुरू होता व त्यांना त्यामध्ये नशिबाचे देखील चांगले साथ मिळत गेली.

पण कधी कधी आपण म्हणतो ना की सुखी दिवसाला किंवा सुखी संसाराला कुणाची तरी दृष्ट लागते अगदी त्याच पद्धतीने गौतम राठोड यांच्या सुखी संसाराला देखील कोणाची दृष्ट लागली आणि त्यांना मध्यंतरीच्या कालावधीत कॅन्सर म्हणजेच कर्करोगाचे निदान झाले. विशेष म्हणजे या आजारामुळे त्यांना किडनी देखील काढावी लागली.

या सगळ्या शारीरिक समस्येमुळे त्यांना अवजड कामे करणे अशक्यप्राय झाले. परंतु या अतिशय बिकट अशा परिस्थितीत देखील त्यांनी हार न मानता काहीतरी करावे या उद्देशाने एरोपोनिक पद्धतीने शेती करण्याचा निर्णय घेतला व अथक प्रयत्न आणि कष्टातून त्यांनी तळेगाव दाभाडे या ठिकाणी उत्तम दर्जाचे केशर पिकवले.

शेतीमध्ये तसे पाहायला गेले तर गौतम राठोड यांना सुरुवातीपासूनच आवड होती. अंगी प्रयोगशीलता हा गुण असल्यामुळे शेतीमध्ये वेगवेगळे प्रकारचे प्रयोग करणे हा त्यांचा विशेष आवडीचा छंद होता व त्याचा फायदा त्यांना यामध्ये झाला. फलोत्पादन क्षेत्रामध्ये त्यांनी अनेक लँडस्केपिक प्रोजेक्ट हँडल केले असून त्यानंतर ते मेकॅनिकल क्षेत्राकडे वळले व घराजवळ त्यांनी स्वतःचे गॅरेज सुरू केले. तब्बल वीस वर्षे त्यांनी हा व्यवसाय केला.

परंतु कर्करोगाचे निदान झाल्यानंतर त्यांना किडनी काढावी लागली व गॅरेज व्यवसाय त्यांना बंद करावा लागला. आता त्यांची प्रकृती उत्तम आहे. परंतु किडनीमध्ये गाठ असल्यामुळे किडनीची शस्त्रक्रिया करावी लागली व यामुळे त्यांना अवजड काम करणे शक्य झाले.

याच परिस्थितीमध्ये त्यांनी तंत्रज्ञानाचा वापर करून बागायती शेती करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा त्यांनी हा निर्णय घेतला तेव्हा त्यांना त्यांच्या एका नातेवाईकाने लागवड व त्या संबंधीची माहिती असलेला एक व्हिडिओ दाखवला व त्यानंतर त्यांनी केशर लागवड करण्याचा निर्णय घेतला.

केशर लागवडीकरिता केले हे प्रयत्न केशर

लागवडीचा निर्णय घेतल्यानंतर त्यांनी केशर विषयावर बराच अभ्यास केला व संशोधन देखील करायला सुरुवात केली. या संबंधीच्या वेगवेगळ्या कार्यशाळांमध्ये त्यांनी हिरीरीने सहभाग नोंदवला. प्रत्यक्षात केशर लागवड कशी करतात या संबंधीचे प्रशिक्षण घेतले व त्यातून छतावरील एका बंदिस्त प्लॉटमध्ये केशरची लागवड करण्याचे त्यांनी ठरवले.विशेष म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर करत त्यांनी त्यांच्या बिल्डिंगच्या छतावर व्हर्टिकल फार्मिंगच्या माध्यमातून दीड एकर जमिनीच्या तुलनेचे वातावरण केशर लागवडीसाठी तयार केले.

एप्रिल 2023 पर्यंत गौतम यांचे केशर लागवडी विषयीची माहिती गोळा करण्याचे काम सुरूच होते व हे काम सुरू असताना ऑगस्टमध्ये त्यांनी काश्मीर या ठिकाणाहून केशरची बियाणे आणले व त्याची लागवड केली.

एरोपोनिक पद्धतीने त्यांनी केशरची लागवड केली व केशर पिकासाठी आवश्यक असलेल्या घटकांची पूर्तता त्यांनी हवेच्या माध्यमातून केली. तीन महिन्याच्या कालावधीमध्ये व्हर्टिकल फार्मिंगच्या माध्यमातून केशर पिकाचे आता बेड तयार झाले आहेत.

लागवडीनंतर तीन महिन्यांनी म्हणजेच ऑक्टोबर महिन्यामध्ये त्यांचे केशर आता काढणीला आले व काढणी सुरू झाली आहे. त्यांनी पिकवलेली केशर हे बारा ते तेरा मिलिमीटर लांबीचे असून सध्या त्याला आठशे रुपये प्रति ग्रॅम एवढा भाव मिळत आहे. आता या दर्जेदार केशरची विक्री करिता परवाना काढून त्याला सर्वांपर्यंत पोहोचवण्याची इच्छा त्यांची आहे.

यावरून गौतम राठोड यांच्या उदाहरणावरून दिसून येते की माणसाची इच्छाशक्ती जर दुर्दम्य असेल तर व्यक्ती कुठल्याही परिस्थितीवर मात करत कुठल्याही क्षेत्रात यशस्वी होऊ शकतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe