Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात अनेक तालुक्यांसह शहरात साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. अहमदनगर शहरात डेंग्यूचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. जानेवारी ते २५ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत तब्बल ५९० डेंग्यू सदृश्य रुग्णांची नोंद झाली आहे.
धक्कादायक म्हणजे त्यातील ४३ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. डेंग्यू सदृश्य आजाराने आतापर्यंत शहरात चार जणांचा मृत्यू झाल्याची नोंद महापालिकेकडे आहे.त्यांची एलआयझा तपासणी केली असून अद्याप अहवाल आलेला नाही.
रुग्ण संख्या वाढली
शहरातील विविध भागात डेंग्यू व डेंग्यू सदृश्य आजाराचे रुग्ण आढळत आहेत. खासगी रुग्णालयात व क्लिनिकमध्ये रुग्ण संख्या वाढली आहे. पंधरा दिवसांपूर्वी नगर शहरात डेंग्यूचे ३२ रुग्ण होते. आता ही संख्या ४३ झाली आहे.
उपनगरात देखील डेंग्यूचे थैमान
शहरासह केडगाव उपनगरात देखील डेंग्यूने थैमान घातले आहे. विविध साथीचे आजार पसरत आहेत. उपनगरातील बरेच क्लिनिक, ओपीडी या फुल्ल झाल्या आहेत. प्रशासनाने औषध फवारणीसह इतर उपाययोजना कराव्यात अशी मागणी सध्या नागरिकांतून होत आहे.
प्रशासनाकडून तयारी
शहरातील आतापर्यंत ४ ते ५ हजार रक्तनमुने घेण्यात आले आहे. घरोघर सर्व्हेक्षण देखील सुरू आहे. त्याबरोबर दर आठवड्याला धूर फवारणी, फॉगिंग करण्यात येत असल्याचे महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी सांगितले.