Ahmednagar News : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवरून संपूर्ण महाराष्ट्रामधील वातावरण चांगलेच तापले आहे. आता गावोगावी याचे लोन पसरले आहे. मराठा आरक्षण आंदोलनाची धग आता ग्रामीण भागातील छोट्या घटकापर्यंत देखील पोहोचली आहे.
यात नगर तालुका देखील मागे नाही. नगर तालुक्यात बहुतांश गावांनी आक्रमक होत आरक्षण मिळेपर्यंत खासदार-आमदारांसह सर्वच पक्षातील राजकीय नेत्यांना गावात प्रवेशबंदी केली आहे.
तसे ठरावच गावोगावी घेण्यात आले आहेत. खड्यात गेला पक्ष आणि खड्ड्यात गेले नेते’ असे म्हणत ‘एकच मिशन-मराठा आरक्षण’ असे फलक गावोगावी झळकत आहेत.
नगर तालुक्यातील ‘या’ गावांत पुढार्यांना ‘नो एंट्री’
राज्य सरकारला मराठा आरक्षणासाठी दिलेली मुदत संपल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषण सुरू केले. त्यानंतर नगर तालुक्यातील वातावरणचांगलेच संतप्त झाले आहे. साखळी उपोषण, राजकीय नेत्यांना गावबंदी, राजकीय सभा, कार्यक्रमांवर बहिष्कार टाकण्यात येत आहे. नगर तालुक्यातील भातोडी, पारगाव, जेऊर, इमामपूर, वाळकी, पिंपळगाव उज्जनी, मदडगाव, राळेगण म्हसोबा, टाकळी काझी, खडकी, पारेवाडी, वाकोडी, सांडवे, दशमी गव्हाण, बहिरवाडी, चास, कामरगाव, भोरवाडी, भोयरे पठार, कौडगाव आदी गावांनी नेत्यांना प्रवेशबंदी केला आहे.
‘अशा’ पद्धतीने केले जातेय आंदोलन !
जेऊरमध्ये नेत्यांना प्रवेश बंदीचे बॅनर लावले आहेत. आरक्षणासाठी अनेक मराठा समाजातील तरुणांनी आत्महत्या केल्या आहेत, तरीही सरकारकडून दखल घेतली जात नाही. सरकारला आणखी किती बळी हवेत, अशी संतप्त प्रतिक्रिया इमामपूर ग्रामस्थांनी व्यक्त केली.
कामरगाव आणि पंचक्रोशीतील लोकांनी गावागावात जात जनजागृती सुरू केली असून, हा लढा तीव्र होताना दिसत आहे. रुईछत्तीशीत साखळी उपोषण सुरु आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान, तसेच वंचित बहुजन आघाडीतर्फे जेऊरमध्ये मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे.
मराठा आरक्षणासाठी छत्तीसीमध्ये साखळी उपोषण सुरू आहे. गुंडेगावमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकल मराठा समाजातर्फे जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा जाहीर केला आहे. बाबुर्डी बेंद येथील सोसायटी संचालकाने आरक्षणासाठी पदाचा राजीनामा दिला आहे. बहिरवाडी, ससेवाडी येथे नेत्यांना गावबंदी, तसेच आगामी आंदोलनाच्या भूमिकेबाबत बैठक आयोजित केली आहे.
मंत्र्यांसह आमदार खासदारांना धसका !
मराठा समाज आक्रमक झाला आहे. या आंदोलनचा आता सर्वच पुढार्यांनी धसका घेतला आहे. अनेक ठिकाणचे मंत्र्यांचे कार्यक्रम रद्द होत आहेत. तर अनेक ठिकाणी स्वतः पुढारीच कार्यक्रमास येण्यास नकार देत आहेत.