अमरावती : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना करताना आर्थिक आघाडीवर ठामपणे उभे राहण्यासाठी विविध क्षेत्रांना उभारी देण्याचे अनेक निर्णय शासनाकडून घेतले जात आहेत.
लॉकडाऊनच्या काळात फार्म टू फॅमिली उपक्रमात अनेक शेतकरी बांधव त्यांची उत्पादने थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवित आहेत.
शेती उत्पादनांचे ब्रँडिंग व सक्षम विपणनाची जोड दिल्यास ते शेतकरी बांधवांसाठी हितकारक ठरेल. त्या दृष्टीने प्रयत्न व्हावेत, असे निर्देश पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले.
कोरोना प्रतिबंध उपाययोजनांत गर्दी टाळण्यासाठी लॉकडाऊनमध्ये भाजीबाजार बंद आहे. या काळात नागरिकांना भाज्या, फळे मिळण्यासाठी फार्म टू फॅमिली हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
यात शहरात भाजीपाला, फळे विक्रीसाठी शेतकरी बांधवांना महापालिकेच्या माध्यमातून परवानगी देण्यात येत आहे.
पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या, कोरोना संकटाचा मुकाबला करत असतानाच अर्थचक्रही गतिमान करण्याची गरज आहे. लॉकडाऊनच्या काळात फार्म टू फॅमिली उपक्रम राबविला जात आहे.
त्यात शेतकरी बांधवांकडून भाज्या, फळे आदी उत्पादने थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवली जात आहेत. काही शेतकरी बांधव उत्पादन विक्रीचे नवनवे प्रयोग करत आहेत.
शेती उत्पादनाला जर ब्रँडिंग आणि विपणनाची जोड दिली तर त्याचा शेतकरी बांधवांना फायदा मिळेल. त्यामुळे हा उपक्रम भरीव व व्यापकपणे राबविण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
पालकमंत्री श्रीमती ठाकूर पुढे म्हणाल्या, सेंद्रिय शेती उत्पादनांनाही मोठी मागणी असते. त्या अनुषंगाने सेंद्रिय शेतीमालाचे प्रमाणीकरण करण्याची प्रक्रिया सुलभ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
सेंद्रिय शेती उत्पादनांच्या विपणनाबाबतही प्रयत्न व्हावेत. शेतीसाठी पूरक उद्योगांनाही चालना देण्यात यावी. त्यादृष्टीने नवे उपक्रम आखण्याचे निर्देश त्यांनी दिले.
जिल्ह्यात पीएम किसान योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्याची कार्यवाही पूर्ण झाली आहे. जिल्ह्यातील खातेधारकांच्या बँक खात्यात दोन हजार रुपयाचा पहिला टप्पा जमा करण्यात आला आहे.
त्यानुषंगाने पुढील कार्यवाहीला गती द्यावी व आवश्यक तो पाठपुरावा करावा. खरिपाच्या अनुषंगाने कर्जपुरवठा सुरळीत होत आहे किंवा कसे,
हे सातत्याने तपासणे आवश्यक आहे. कुणीही पात्र शेतकरी बांधव कर्जपुरवठ्यापासून वंचित राहू नये, याची काळजी घ्यावी, असे निर्देशही त्यांनी दिले.
कोरोना प्रतिबंधासाठी लॉकडाऊनमध्ये शनिवारी दुपारी ३ वाजतापासून ते सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत सर्व दुकाने, व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे.
त्याला गत आठवड्याला नागरिकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. त्याबद्दल आभार मानत पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या, यापुढेही सर्व नागरिकांनी याकाळात घरीच राहून प्रशासनाला सहकार्य करावे.
या काळात वैद्यकीय सेवा व औषधी विक्री केंद्रे सुरू राहतील. आवश्यक मालवाहतूक सुरु राहील, असेही त्यांनी सांगितले.
हाय रिस्क क्षेत्र, कंटेन्मेंट झोनमध्ये घरोघरी जाऊन सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे. सातत्यपूर्ण सर्वेक्षण व तपासण्यांतूनच परिपूर्ण माहिती मिळेल व उपाययोजनांना वेग देता येईल.
त्यामुळे माहितीचे संकलन काटेकोरपणे करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. नागरिकांनीही स्वत:ची जबाबदारी ओळखून मास्क वापरणे व सोशल डिस्टन्सिंग पाळणे आवश्यक आहे.
कुठलीही माहिती लपवू नये. योग्य ती दक्षता सर्वांनी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.