Parner News : पारनेर तालुक्यातील शहाजापूरजवळील श्रीक्षेत्र कौडेश्वर या ठिकाणी सुरू असलेल्या श्री माऊली कृपा गोशाळेत ६०० हून अधिक जनावरे असून, यावर्षी या परिसरात पुरेसा पाऊस न झाल्याने गोशाळेतील पशुधनासाठी लागणाऱ्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
मागील डिसेंबर २०२२ ते ऑगस्ट २०१३ पर्यंत चारा विकत घ्यावा लागत होता; परंतु यंदा गणेशोत्सवाच्या काळात या परिसरात पावसाने हजेरी लावल्याने डोंगर परिसरात चारा उपलब्ध झाला, यामुळे चाऱ्याची समस्या काही काळापुरती मिटली होत.
मात्र, नंतर पावसाने पाठ फिरवल्याने डोंगरावरील चारा सध्या सुखण्यास सुरुवात झाली आहे. दरवर्षी ऑगस्ट ते डिसेंबर या काळात डोंगरावर ५ महिने पुरेल एवढा चारा उपलब्ध असतो;
परंतु यंदा पावसानंतर एका महिन्यात चारा सुकू लागला असून, पाऊस न झाल्यास जास्तीत जास्त महिनाभर हा चारा पुरु शकतो. मागीलवर्षी ९ महिने चारा विकत घ्यावा लागला होता. हा चारा खर्च समाजाच्या सहभागातून करण्यात आला होता.
मागील वर्षीचे चाऱ्याचे ५ लाखांपेक्षा जास्त कर्ज गोशाळेच्या डोक्यावर असतानाच या वर्षी चाऱ्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. ही चाऱ्याची समस्या लक्षात घेऊन व प्रत्यक्ष परिस्थिती पाहून पुढीलवर्षी संपूर्ण चाऱ्याची व्यवस्था सरकारने करावी तसेच मागील कर्ज मिटविण्यासाठी दानशूर व्यक्तींनी मदत करावी, असे आवाहन गोशाळा चालक हभप नितीन महाराज शिंदे यांनी केले आहे.