मराठा आरक्षणप्रश्नी ग्रामस्थ आक्रमक ! साखळी उपोषण सुरु; राजकीय नेते, पदाधिकाऱ्यांना गावबंदी

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी उभारलेल्या लढ्याला राज्यभरातून जोरदार प्रतिसाद मिळत आहे. जरांगे यांच्या उपोषणाला पाठींबा तसेच मराठा आरक्षणासाठी नगर तालुक्यातील वाळकी येथील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. ग्रामस्थांनी साखळी उपोषणास प्रारंभ केला असून राजकीय नेते, पदाधिकारी यांना गावबंदी केली आहे.

वाळकी येथील सकल मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चा व ग्रामस्थांनी येथील पंचमुखी हनुमान मंदीरापासून पदयात्रा काढली. ‘चुलीत गेले नेते, चुलीत गेले पक्ष, मराठा आरक्षण हेच आमचे लक्ष’ अशा घोषणाबाजी करत परिसर दणाणून गेला. पदयात्रा बाजार तळावर आल्यावर समितीच्या कार्यकर्त्यांनी मराठा आरक्षणप्रश्नी आपले विचार व्यक्त केले.

मराठा समाजावर होत असलेला अन्याय दूर करण्यासाठी शासनाने तत्काळ आरक्षण द्यावे. मराठा समाजातील विद्यार्थ्यांना न्याय मिळावा. आरक्षणप्रश्नी शासनाने मराठा समाजाचा अंत पाहू नये.

आरक्षणाची तीच वेदना घेऊन मनोज जरांगे पाटील समाजासाठी लढत आहेत. आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करत मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांच्या मागे खंबीरपणे उभे आहोत. शासनाने विना विलंब आरक्षण प्रश्न मार्गी लावावा असे मनोगत धर्मराज शैक्षणिक संस्थेचे सचिव विक्रम कासार, उद्योजक संदीप जाधव, आशिष कासार, मोहनसर बोठे, सोमनाथ कांडेकर आदींनी व्यक्त केले.

वाळकी येथे मंडप उभारून सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषणास प्रारंभ करण्यात आला. सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना गावबंदी करण्यात आली. आम्ही आपला आदर करतो, आपणही आरक्षणासाठी मनाचा मोठेपणा दाखवा, असे आवाहन सर्व पक्षीय नेत्यांना करण्यात आले.

दरम्यान, वाळकी परिसरातील गुंडेगाव, राळेगण, दहिगाव, रुईछत्तीशी आदी गावांमध्येही सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांनी उभारलेल्या लढ्याला पाठींबा देत राजकीय नेत्यांना गावबंदी केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe