Loan for Women : महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर मिळेल 10 लाखांचे कर्ज! वाचा कशी आहे प्रक्रिया?

Loan for Women

Loan for Women : समाजातील विविध घटकांकरिता केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून व्यवसाय उभारण्यासाठी आर्थिक मदत व्हावी या दृष्टिकोनातून अनेक योजना राबवल्या जात आहेत. या अनुषंगानेच महिला सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून देखील महिलांचा सर्वांगीण विकास व्हावा व समाजात त्यांना मानाचे जीवन जगता यावे याकरिता देखील सरकारच्या अनेक योजना आहेत.

अशा योजनांच्या माध्यमातून महिलांना आर्थिक मदत करण्यात येते. महिलांना स्वतःचा व्यवसाय उभा करता यावा व त्या आर्थिक स्वयंपूर्ण व्हाव्यात याकरिता देखील अनेक योजना आहेत. याचा अनुषंगाने पंजाब नॅशनल बँक देखील महिलांना रोजगार देण्यासाठी एक विशेष योजना राबवत असून ती योजना म्हणजे पीएनबी महिला उद्योग निधी योजना होय.

ज्या महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांना आर्थिक मदत प्रदान करण्यासाठी ही योजना खूप महत्त्वपूर्ण आहे. या माध्यमातून महिलांना कमीत कमी व्याजदरात आणि कमीत कमी अटींमध्ये कर्ज दिले जाते व या माध्यमातून महिला स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतात. बऱ्याच महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असते. परंतु पैशां अभावी त्या व्यवसाय सुरू करू शकत नाही. त्यामुळे पंजाब नॅशनल बँकेची ही योजना अशा महिलांना खूप मोठी मदत करू शकते.

कोणत्या कारणांसाठी मिळेल महिलांना कर्ज?

या योजनेच्या माध्यमातून महिला लघु उद्योग क्षेत्रात स्वतःचा प्रकल्प सुरू करण्यासाठी पंजाब नॅशनल बँकेकडून आर्थिक सहाय्य घेऊ शकतात. एखाद्या महिला उद्योजकाचा व्यवसाय असेल व तो आर्थिक अडचणींना तोंड देत असेल तर या योजनेचा लाभ घेऊन महिला स्वतःच्या व्यवसायाला आर्थिक दृष्टिकोनातून बळकटी देऊ शकतात.

या योजनेच्या मदतीने लघुउद्योग युनिट्स आणि सेवा औद्योगिक उपक्रमाच्या विस्तारासाठी देखील आर्थिक मदत घेतली जाऊ शकते. तसेच उद्योग आणि व्यवसायाच्या संबंधित आधुनिकीकरण आणि अपग्रेडेशन मध्ये देखील या योजनेचा लाभ महिला वर्गाला घेता येईल. या योजनेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या निधीचा उपयोग मध्यम आणि लघु उद्योगांना सेवा, उत्पादन आणि उत्पादनाशी संबंधित आवश्यक गोष्टींसाठी वापरला जाऊ शकतो.

किती मिळू शकते महिला वर्गाला कर्ज?

पंजाब नॅशनल बँकेच्या या योजनेमुळे महिला स्वतःचा व्यवसाय किंवा छोटा व्यवसाय सुरू करण्यासाठी दहा लाख रुपयांपर्यंत कर्ज घेऊ शकतात. तसेच स्वतःचा व्यवसाय असेल तर त्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी देखील याचा उपयोग होऊ शकतो.

किती आहे परतफेडीचा कालावधी?

या योजनेच्या माध्यमातून कर्ज घेतल्यानंतर तुम्हाला पाच ते दहा वर्षाच्या आत कर्जाची परतफेड करावी लागेल. यामध्ये व्याजदरात वेळोवेळी बदल होऊ शकतो. परंतु असे म्हटले जाते की या योजनेद्वारे उपलब्ध असलेल्या कर्जावरील व्याज हे इतर कर्जाच्या तुलनेत खूप कमी आहे.

हे कर्ज कुणाला मिळू शकते?

या योजनेच्या माध्यमातून कर्जासाठी फक्त महिलाच अर्ज करू शकतात. ज्यांना छोटासा व्यवसाय सुरू करायचा आहे किंवा आहे तो व्यवसाय वाढवायचा आहे त्यांच्यासाठी ही योजना खूप महत्त्वपूर्ण आहे. तसेच कर्जासाठी अर्ज करणाऱ्या महिलांचा व्यवसायामध्ये 51% पेक्षा अधिक मालकी हिस्सा असणे गरजेचे आहे. तसेच प्रकल्पाची किंमत दहा लाख रुपये पेक्षा जास्त नसावी तसेच मंजूर कर्जानुसार संबंधित बँकेकडून प्रतिवर्ष एक टक्के सेवा कर आकारला जातो.

कर्जातून महिला कोणता व्यवसाय सुरू करू शकतात?

या योजनेतून मिळालेल्या कर्जामुळे महिला ऑटो रिपेरिंग आणि सर्विस सेंटर, ब्युटी पार्लर तसेच केबल टीव्ही नेटवर्क, कॅन्टीन आणि रेस्टॉरंट, नर्सरी, सायबर कॅफे, डे केअर सेंटर, सलून, शेती आणि कृषी उपकरणे सेवा, टेलरिंग असे अनेक व्यवसाय सुरू करू शकतात. याशिवाय तुम्ही संबंधित व्यवसायांचे प्रशिक्षण केंद्र देखील या माध्यमातून सुरू करू शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe