पृथ्वी कशी नष्ट होणार ? शास्त्रज्ञांनी स्पष्टच सांगितलं…

Marathi News : आपल्या सूर्याचा जेव्हा अंत जवळ येईल तेव्हा तो त्याच्या विद्यमान आकारापेक्षा १ हजार पट मोठा झालेला असेल. त्यावेळी पृथ्वी क्षणात नष्ट होईल. मंगळ, बुध, गुरू, शनि हे इतर ग्रहदेखील बाष्पीभवन किंवा इतर प्रक्रियांमुळे नामशेष होतील, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

तब्बल ५७ प्रकाशवर्षे दूर असलेला एक तारा त्याच्या अंतिम घटका मोजत आहे. मरणासन्न अवस्थेतील असलेल्या या ताऱ्याच्या आणि त्यामुळे त्या ताऱ्याभोवतालच्या ग्रहांच्या अवस्थेवरून शास्त्रज्ञांनी आपल्या सूर्याचे आणि सौरमालेतील इतर ग्रहांचे भवितव्य वर्तवले आहे.

‘रो कोरोनिआ बोरियालिस’ असे या मृत्यूशय्येवरील ताऱ्याचे नाव आहे. हा तारा आपल्या सौरमालेप्रमाणेच हॅबिटेबल झोन म्हणजे सजीवसृष्टीसाठी पोषक वातावरणात आहे. म्हणजेच या ताऱ्याभोवती देखील पृथ्वीसारखा एक ग्रह प्रदक्षिणा घालत आहे.

पिवळा-नारंगी रंगाच्या या ताऱ्याचे आयुष्य संपुष्टात आले असून, येत्या १ अब्ज वर्षात त्याचे तप्त लाल गोळ्यात रूपांतर होईल. त्यावेळी त्याच्या भोवतालचे चारही ग्रह या तारकीय वातावरणामुळे नष्ट होतील.

हीच परिस्थिती आपला सूर्य आणि पृथ्वीसह इतर ग्रहांबाबतही होणार असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. या ताऱ्याचे वजन सूर्याच्या ९६ टक्के आहे. आकाराच्या बाबतीत तो सूर्यापेक्षा १.३ पट मोठा आहे. तर तो सूर्याच्या बाबतीत १.७ पट प्रकाशमान आहे. त्याचे आयुष्य सूर्यापेक्षा दुप्पट आहे. सूर्याचे वय ४.६ अब्ज वर्षे आहे.