Rabi Crop:- सध्या शेतकरी बंधूंची रब्बी हंगामाची लगबग सुरू झालेली असून राज्यामध्ये यावर्षी खूपच कमी पाऊस झाल्यामुळे पाण्याची उपलब्धता पाहून शेतकरी पिकांचे नियोजन करताना यावर्षी दिसून येत आहेत.
रब्बी हंगामामध्ये प्रामुख्याने गहू, ज्वारी तसेच हरभरा इत्यादी पिकांची लागवड महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर केली जाते. परंतु यावर्षी पाऊस कमी असल्यामुळे आहे त्या पाण्यामध्ये कोणत्या पिकाची लागवड शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरेल याबाबतीत देखील विचार करणे खूप गरजेचे आहे व त्या दृष्टिकोनातूनच नियोजन होणे देखील शेतकऱ्यांना फायद्याचे ठरू शकते.

तसेच पाण्याची उपलब्धता पाहून नेमके किती क्षेत्रात लागवड करावी हे देखील निश्चित करणे महत्त्वाचे आहे. याच दृष्टिकोनातून आपण या रब्बी हंगामामध्ये शेतकरी बंधूंनी नेमक्या कोणत्या पिकांची लागवड करावी जेणेकरून शेतकऱ्यांना बाजारपेठेत चांगला दर मिळवून देऊ शकेल किंवा फायद्याचे ठरू शकेल याबद्दलचे महत्त्वपूर्ण माहिती बघू.
रब्बी हंगामात या पिकाची लागवड ठरेल फायद्याचे
1- गहू रब्बी हंगामामध्ये गव्हाचे उत्पादन किंवा लागवड मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांनी पाण्याची व्यवस्था किंवा उपलब्धता बघून गव्हाची लागवड करणे हा पर्याय खूप आर्थिक दृष्टिकोनातून फायद्याचा ठरू शकतो. कारण गव्हाची जर बाजारपेठेतील स्थिती पाहिली तर गव्हाचे भाव हे वाढतच राहतील अशी स्थिती आहे.
सध्या गव्हाला तीन हजार ते साडेतीन हजार रुपयांपर्यंत दर मिळत आहे. जर मागील दोन ते तीन वर्षांच्या अनुषंगाने गव्हाच्या उत्पादनाचा विचार केला तर ते घटते असल्यामुळे मागील काही महिन्यांपासून गव्हाचे दर वाढताना दिसून येत आहेत. आपल्याला माहित आहे की गव्हाचे दर नियंत्रणात आणण्याकरता सरकारने स्टॉक लिमिट तसेच निर्यात बंदी यासारखे शस्त्रे उपसली व व्यापाऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला.
परंतु तरी देखील गव्हाचे दर नियंत्रणात आणण्यास सरकारला हवे तेवढे यश आलेले नाही. त्यातच यावर्षी पाऊस कमी झाल्यामुळे गव्हाच्या उत्पादनामध्ये मोठी घट येण्याची शक्यता असल्यामुळे येणाऱ्या कालावधीत देखील गव्हाचे दर चांगलेच राहू शकतात असा जाणकारांचा अंदाज आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याचा अंदाज घेऊन गव्हाची लागवड हा पर्याय उत्तम ठरू शकतो.
2- हरभरा लागवड रब्बी हंगामामध्ये अगदी कमीत कमी पाण्याच्या उपलब्धतेत येणारे हमखास पीक म्हणजे हरभरा होय. यावर्षी देखील पाण्याची उपलब्धता कमी असल्यामुळे हरभरा उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. जर आपण तूर आणि उडीद यांच्या दराचा विचार केला तर ते तेजित आहेत व यावर्षी उडदाचे उत्पादन घटले आहे आणि तुरीची लागवड देखील यावर्षी पाच टक्क्यांनी कमी झालेली होती
व पाण्याची उपलब्धता कमी असल्यामुळे तूर हे पीक कितपत उत्पादन देईल याबाबतीत शंकाच आहे. त्यामुळे यावर्षी देखील तुरीचे उत्पादन कमी राहील व तिचा भाव तेजितच राहण्याचा अंदाज आहे.जर तूर आणि उडदाचे भाव तेजीत राहिले तर हरभऱ्याची मागणी वाढते व त्याचे देखील भाव वाढतात असे तरी आतापर्यंतचे गणित आहे. त्यामुळे हरभरा लागवड देखील फायद्याची ठरू शकते.
3- ज्वारी रब्बी हंगामामध्ये ज्वारी पिकाची लागवड शेतकऱ्यांसाठी अनेक दृष्टीने फायद्याची ठरू शकते. गेल्या काही वर्षांचा विचार केला तर ज्वारीला मागणी वाढत असून आहारात देखील ज्वारीला आता पसंती देण्यात येत आहे. मागणीच्या मानाने ज्वारीचा पुरवठा देशांमध्ये कमी असल्याने बाजार भाव चांगले मिळत आहेत.
त्यातच यावर्षी दुष्काळाची स्थिती असल्यामुळे ज्वारीचे उत्पादन घटण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे यावर्षी ज्वारीला चांगला दर मिळू शकतो. त्यामुळे उपलब्ध पाण्याचा अंदाज घेऊन ज्वारी लागवड करणे शेतकऱ्यांसाठी फायद्याचे ठरू शकते.