Ahmednagar Politics : काँग्रेस पक्षासोबत कायम इमानदार राहिलो आहोत असे सांगणार्यांचा इतिहास जनतेला चांगलाच माहित आहे.त्यांनी पक्ष संघटनेला धरुन किती काम केले? मेव्हणे लोकसभेला उमेदवारी करीत असताना त्यांनी कुणाला मते दिली. ते सर्व जनतेला माहित आहे, अशी टीका महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आमदार बाळासाहेब थोरात यांच्यावर नाव न घेता केली.
विखे पाटील हे काल दुपारी नाशिककडे जात असताना संगमनेर येथील शासकीय विश्रामगृहात काही वेळ थांबले होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी आ.बाळासाहेब थोरात यांच्यावर टीका केली.
आ.थोरात यांनी तालुक्यातील वडगाव पान येथील एका कार्यक्रमात बोलताना विखे परिवारावर टीका केली होती. खासदारकीच्या माध्यमातून विखे यांनी ३५-४० वर्ष काढली आहेत. याकाळात त्यांना साधा एक बसस्टॉप बांधता आला नाही.
विखे हे संधीसाधू असून त्यांनी इकडे-तिकडे उड्या मारुन मंत्रीपदे मिळवली, अशी टीका आ.थोरात यांनी केली होती.याबाबत महसूल मंत्री विखे पाटील यांना विचारले असता आ.थोरात यांनी केलेल्या वक्तव्याचा आपण निषेध करतो,असे ते म्हणाले.
संगमनेर येथील सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक पदाश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील होते. मात्र आता दुसरेच संस्थापक तयार करण्यात आले आहे. जुन्या लोकांचे नाव घेऊन हे काय साध्य करणार आहे. आमच्यावर टीका करून ते स्वतःची पापे झाकण्याचा प्रयत्न करत आहे.
मलाही त्यांच्या ‘वडिलांबाबत बोलता येईल, मात्र जी व्यक्ती हयात नाही त्याबाबत बोलणार नाही, असे विखे यांनी सांगितले. मराठा आरक्षणाबद्दल बोलताना ते म्हणाले, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री दोघांनीही मराठ्यांना कायदेशीर टिकणारे आरक्षण देण्याची भूमिका घेतली आहे.मराठ्यांना हेच सरकार आरक्षण देणार असल्याचे ना.विखे यांनी सांगितले.
ज्येष्ठ पदाधिकाऱ्याच्या मुलाला सुनावले खडे बोल !
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे विश्राम गृहामध्ये थांबलेले असताना एका पदाधिकाऱ्याचा मुलगा त्यांना निवेदन देण्यासाठी आला होता. यावेळी मंत्री विखे यांनी त्याला चांगलेच झापले.या मुलाने फ्लेक्स बोर्डवर विरोधी नेत्याचा फोटो ‘लावल्याच्या कारणावरून विखे यांनी त्याला जाब विचारला. एकतर आमच्याकडे थांबा किंवा त्यांच्याकडे थांबा,असा सल्ला त्यांनी या मुलाला दिला.