मनमाड ते मुंबई हा मध्य रेल्वेचा एक महत्त्वाचा रेल्वेमार्ग असून मनमाड आणि नाशिककरांसाठी मुंबईला जा-ये करण्याच्या दृष्टिकोनातून गेल्या बऱ्याच वर्षापासून वेगवेगळ्या प्रकारच्या एक्सप्रेस प्रवाशांसाठी या रेल्वे मार्गावर सेवा देत आहेत. त्यातीलच एक गेल्या 30 वर्षापासून नाशिककरांशी जवळचे नाते असलेली गोदावरी एक्सप्रेस ही एक महत्त्वाची एक्सप्रेस गाडी होती.
नाशिक आणि परिसरातून मुंबईला जाणारे जे काही नोकरी पेशा व्यक्ती आहेत त्यांच्याकरिता तसेच व्यापारी वर्ग, विद्यार्थी आणि इतर प्रवाशांना खूप सोयीचे असलेली ही गाडी अचानक मध्य रेल्वेने बंद केल्यामुळे आता नागरिकांची मोठी गैरसोय होईल असे प्रवासी संघटनेचे म्हणणे आहे.
गोदावरी एक्सप्रेस अशाप्रकारे बंद केल्यामुळे आता प्रवाशांनी खूप मोठ्या प्रमाणावर नाराजी देखील व्यक्त केलेली आहे.एवढेच नाही तर ही एक्सप्रेस मनमाड येथून पूर्वीप्रमाणेच सोडण्यात यावी अशी मागणी प्रवासी संघटनेच्या माध्यमातून करण्यात आली असून अन्यथा आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आलेला आहे.
गोदावरी एक्सप्रेस ऐवजी सीएसएमटी– धुळे एक्सप्रेस केली सुरू
गोदावरी एक्सप्रेसचे जर वेळापत्रक पाहिलं तर लोकमान्य टिळक टर्मिनस अर्थात कुर्ला स्टेशन वरून सुटणारी ट्रेन क्रमांक 12118 एलटीटी- मनमाड सुपरफास्ट एक्सप्रेस मुंबई वरून सकाळी आठ वाजून 35 मिनिटांनी निघायची आणि दुपारी एक वाजता मनमाडला पोहोचायची.
परंतु आता ही एक्सप्रेस बंद करण्यात आलेली असून त्या ऐवजी आता सीएसएमटी ते धुळे ही एक्सप्रेस सुरू करण्यात आलेली आहे. 12 नोव्हेंबर पासून ही ट्रेन क्रमांक 11011/ 11012 ही एक्सप्रेस सीएसएमटी ते धुळे या दरम्यान धावणार आहे. ही एक्सप्रेस सीएसएमटी येथून दुपारी बारा वाजता निघेल व धुळ्याला रात्री आठ वाजून 55 मिनिटांनी पोहचणार आहे.
तसेच धुळ्यावरून परतीची ट्रेन 11012 धुळे ते सीएसएमटी ही धुळ्याहून सकाळी सहा वाजून 30 मिनिटांनी निघेल व दुपारी सव्वा दोन वाजता सीएसएमटीला पोहोचणार आहे. या ट्रेनला दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, निफाड, लासलगाव, मनमाड जंक्शन, नांदगाव, जामदा आणि शिरूळ असे थांबे देण्यात आलेले आहेत.
या ट्रेनला 16 एलएचबी डबे असणार असून त्यामध्ये एक एसी चेअर कार, तेरा नॉन एसी चेअर कार यामध्ये पाच आरक्षित आणि आठ अनारक्षित डबे असणार आहेत. तसेच एक जनरल सेकंड क्लास कम ब्रेक व्हेन आणि एक जनरेटर अशी डब्यांची रचना असणार आहे.
गोदावरी एक्सप्रेस ऐवजी या गाड्या देखील झाल्या बंद
सीएसएमटी धुळे एक्सप्रेस सुरू केल्यामुळे 01065/01066 दादर ते धुळे स्पेशल आणि 02101/02102 दादर ते मनमाड स्पेशल या गाड्या 12 तारखेपासून बंद करण्यात आले आहेत.