एपीआय कै.अमोल कुलकर्णी यांना गृहमंत्री अनिल देशमुख यांची भावपूर्ण श्रद्धांजली

Ahmednagarlive24
Published:

मुंबई, दि. १६ : कोरोना विषाणूशी लढताना धारावी शाहूनगर पोलीस स्टेशनचे ए.पी.आय. अमोल कुलकर्णी यांचे दुर्दैवाने निधन झाले.

धारावी येथील शाहूनगर पोलीस स्टेशन येथे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज या पोलीस योद्ध्यास श्रद्धांजली अर्पण केली.

यावेळी  शालेय शिक्षण मंत्री श्रीमती वर्षा गायकवाड, मुंबई पोलीस आयुक्त परमबिर सिंग, अपर पोलीस आयुक्त विनय चोबे उपस्थित होते.

कोरोना विरुद्ध असलेल्या लढाईत आपले पोलीस बांधव मृत्युमुखी पडत आहेत. त्याचे दुःख होत आहे. हे युद्ध संपूर्ण जगात मानवाला वाचवण्यासाठी सुरू आहे.

याचा मुकाबला आपल्या सर्वांना मिळून करायचा आहे. पोलिसांच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी महाराष्ट्र सरकार खंबीरपणे उभे आहे. असे गृहमंत्री यावेळी म्हणाले. यावेळी कुलकर्णी यांच्या सोबत काम करणारे कर्मचारी भाऊक झाले होते.

अमोल कुलकर्णी यांच्या विषयी सांगताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले होते. या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना अनिल देशमुख यांनी हिंमत दिली.

यावेळी श्री. देशमुख यांनी तेथे उपस्थित पोलीस कर्मचारी, राज्य राखीव दलाचे जवान यांच्याशी संवाद साधून  सर्वांना धीर दिला.

दरम्यान गृहमंत्री अनिल देशमुख यांनी धारावी पोलीस स्टेशनला सुद्धा भेट देऊन तेथील कर्मचाऱ्यांसोबत संवाद साधला.

यानंतर त्यांनी धारावीच्या विविध भागांमध्ये जाऊन पाहणी केली. तेथे बंदोबस्तात असलेल्या कर्मचाऱ्यांसोबत सुद्धा त्यांनी संवाद साधला.

तसेच रस्त्याने जात असताना जमलेले सफाई कामगार यांच्याशी देखील थांबून संवाद साधला. काम करताना काही अडचणी येत असतील तर त्या स्पष्टपणे शासनास सांगा. शासन आपल्या पाठीशी आहे. असे गृहमंत्री म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment