कोल्हापूर, दि. 16 (जिमाका) : उत्तरप्रदेशमधील बलियाकडे 1 हजार 456 श्रमिक विशेष रेल्वेने आज सायंकाळी 6 वाजता कोल्हापुरातून रवाना झाले. हे सर्व मजूर इचलकरंजी नगरपालिका क्षेत्रातील आहेत.
भारत माता की जय ! छत्रपती शाहू महाराज की जय ! छत्रपती शिवाजी महाराज की जय ! अशा घोषणा देत या मजुरांना उपस्थितांनी शुभेच्छा दिल्या.
लॉकडाऊनमुळे आजअखेर जिल्ह्यात अडकून पडलेल्या परराज्यातील सुमारे 14 हजार 956 श्रमिकांना आज रात्रीअखेर 11 श्रमिक विशेष रेल्वेने पाठविण्यात आले.
यामध्ये उत्तरप्रदेशामधील 9616 मजूर, बिहारमधील 2776 मजूर, राजस्थानमधील 1477 मजूर आणि मध्यप्रदेशातील 1066 मजुरांचा समावेश आहे.
इचलकरंजीतील 1456 मजुरांना आज सायंकाळी 6 वाजता रेल्वे स्थानकातून श्रमिक विशेष रेल्वेतून बलियाकडे रवाना करण्यात आले, या रेल्वेस अतिरिक्त पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, सहायक कामगार आयुक्त अनिल गुरव आणि डॉ.डी.वाय.
पाटील पॉलिटेक्नीकचे प्राचार्य डॉ.महादेव नरके यांच्या प्रमुख उपस्थितीत फिडिंग इंडिया या सेवाभावी संस्थेच्या स्वाती कदम आणि संध्या घोटणे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून बलियाकडे ही विशेष रेल्वे मार्गस्थ करण्यात आली.
यावेळी रेल्वेचे स्टेशन प्रबंधक ए.आय.फर्नांडिस, दीपा पाटील, रुपाली पाटोळे, सुजाता चव्हाण, वैशाली महाडीक, चंदा बेलेकर, माजी महापौर विक्रम जरग,संपतराव पाटील, प्रदिप चव्हाण आदी उपस्थित होते.
उत्तरप्रदेश शासनाकडून मंजुरी आल्यानंतर जिल्हा प्रशासनाने इचलकरंजी नगरपालिका क्षेत्रातील 1456 मजुरांची यादी करुन रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून उत्तरप्रदेशातील बलिया येथे जाणाऱ्या रेल्वेचे नियोजन केले. मंजुरी मिळालेल्या कामगारांना बसमधून छत्रपती शाहू महाराज टर्मिनस येथे आणण्यात आले. याठिकाणी प्रवासाची रेल्वे तिकीटे त्यांना देण्यात आली.
जिल्हा प्रशासन आणि सेवाभावी संस्थांच्यावतीने या मजुरांना जेवण, नाश्ता आणि पाणी अशा किटचे वाटप करण्यात आले. प्रशासनाने, सेवाभावी संस्थेने त्यांची केलेली सुविधा आणि गावी जाण्याचा आनंद प्रत्येक मजुराच्या चेहऱ्यावर जाणवत होता.
आज आणि उद्यासाठी त्यांना लागणाऱ्या जेवणाचे किट त्यांनी या मजुरांना दिले. थर्मल स्कॅनिंग, सॅनिटायझर आणि सामाजिक अंतर याचा वापर करत त्यांना रेल्वेच्या बोगीमध्ये प्रवेश देण्यात आला.
उपस्थितीतांसोबतच रेल्वेत बसलेल्या मजुरांनीही टाळ्या वाजवून आणि भारत माता की जय ! छत्रपती शाहू महाराज की जय ! छत्रपती शिवाजी महाराज की जय ! अशा घोषणा देत आनंद व्यक्त केला.
लहान बाळांना 200 मिली दुधाची बॉटल
जिल्ह्यामधून आपापल्या गावी परतणाऱ्या मजुरांना गेल्या सहा दिवसापासून त्यांच्या दोन दिवसाच्या जेवणाची व्यवस्था पालकमंत्री सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.डी.वाय.पाटील पॉलिटेक्नीकचे प्राचार्य डॉ.महादेव नरके काळजीपूर्वक करीत आहेत.
प्रत्येक मजुराला जेवण, नाश्ता, पाण्याची बॉटल आणि मास्क हे उपलब्ध करुन देण्याच्या व्यवस्थेवरही डॉ. नरके लक्ष देत आहेत.
आज तर श्रमिक विशेष रेल्वेने गावी जाणाऱ्या मजुरांच्या लहान बाळांसाठी प्रत्येकी 200 मिली दुधाची बॉटलही देऊन मजुरांच्या बालकांची विशेष काळजी घेतली.
राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनमुळे अडकलेल्या कामगार, पर्यटक, प्रवासी, विद्यार्थी अशा सर्वांना त्यांच्या-त्यांच्या जिल्ह्यांमध्ये परत पाठवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला.
त्यामुळे या कामगारांना मोठा दिलासा मिळाला आहे, कोल्हापूर जिल्ह्यामधील कामगार, मजूर त्यांच्या जिल्ह्याकडे घेऊन आतापर्यंत 10 श्रमिक विशेष रेल्वे रवाना झाल्या असून
आज रात्री 10 वाजता बलियाला जाणारी ही 11 वी श्रमिक विशेष रेल्वे आहे. या सर्वांच्या रेल्वेच्या तिकिटांचा खर्च हा मुख्यमंत्री सहायता निधीतून करण्यात आला आहे.