इंदौर कोरोना संकटाच्या काळात संपूर्ण देश एकजुटीने लढतो आहे. अनेक विधायक कामे करत नागरिकांनी आदर्श घालून दिला आहे. परंतु याच देशात काही अमानुष कृत्यही होत आहेत.
शनिवारी (16 मे) ला एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका नवजात मुलीला तिचे पालक पोत्यात गुंडाळून सोडून गेले. त्या मुलीला अक्षरशः मुंग्या लागल्या होत्या.
पोलिसांनी स्थानिक रहिवाशांच्या मदतीने मुलीला वाचवलं आणि उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे. याबाबत अधिक माहिती अशी; राऊ परिसरातील रंगवासा औद्योगिक क्षेत्रात नवजात मुलगी रस्त्याच्या कडेला पोत्यात गुंडाळलेली आढळली.
बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकून नागरिकांचे त्याकडे लक्ष गेले. स्थानिक महिलांनी चिमुकलीला कचऱ्यातून बाहेर काढलं आणि तिच्या शरीरावरील मुंग्या काढून नवजात बाळाला आंघोळ घालून स्वच्छ केलं.
पोलिसांनी मुलीला जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. जिथे उपचारानंतर तिची प्रकृती सध्या ठीक आहे. मुलीच्या बाबतीत भारतीय दंड विधान कायद्याच्या कलम 317 नुसार अज्ञात आरोपींविरूद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.