Ahmednagar News : पाथर्डी तालुक्यातील कळसपिंप्री येथील अस्मिता महादेव भवार हिची भारतीय आर्मी नेव्ही दलात अग्निवीर जवान म्हणून निवड झाली आहे. अस्मिता ही तालुक्यातील पहिली अग्निवीर जवान ठरली आहे.
देशात कुठल्याच क्षेत्रात महिला मागे नाहीत. खडतर समजल्या जाणाऱ्या संरक्षणाच्या क्षेत्रातही आता तरुणी पुढे येत आहेत. पाथर्डी तालुक्यातील कळसपिंप्री येथील अस्मिता महादेव भवार ही नौदलाची परिक्षा उत्तीर्ण होऊन तिची भारतीय संरक्षण दलात निवड झाली आहे.
सैन्यात महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी अग्निवीरांच्या भरतीमध्ये मुलींनाही संधी देण्यात आली आहे. सैन्यदलासारख्या खडतर अशा सेवेत आता महिलाही भरती होऊ लागल्याने महिला कोणत्याच क्षेत्रात मागे नसल्याचे स्पष्ट होत आहे.
लहानपणापासून अभ्यासात हुशार असलेल्या अस्मिताला देशसेवेची आवड होती. आपण वेगळं काही तरी करू शकतो, या भावनेने तिने मुंबईत अग्नीवीरची परिक्षा दिली. या परीक्षेत उत्तीर्ण झाली.
ओरिसा राज्यातील आयएनएस चिल्खा सेंटर येथे प्रशिक्षणासाठी गुरुवारी (ता.१७) ती रुजू झाली. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर महिला अग्निवीर म्हणून देश रक्षणासाठी सज्ज होणार आहे. तिने चिकाटीच्या जोरावर हे यश संपादन करून मुलीही कुठेच मागे नाहीत, हे सिद्ध करून दाखवले आहे.