Onion News : परतीच्या पावसाने दगा दिल्याने तसेच पाणी टंचाईसदृष्य परिस्थितीचा रब्बीतील पिकांच्या पेरण्यावर मोठा परिणाम झाला आहे. तालुक्यात कांदा हे प्रमुख नगदी पीक असून
यंदा अत्यल्प पाऊस झाल्याने उन्हाळ कांद्याची लागवड मागील वर्षीच्या तुलनेत चाळीस टक्क्यांपेक्षा कमी होणार असल्याचा अंदाज कृषी विभागाकडून व्यक्त होत आहे.
मागील वर्षी श्रीरामपूर तालुक्यात मोठ्या क्षेत्रावर उन्हाळ (रब्बी) कांद्याची लागवड झाली होती. परंतू यंदा मात्र, मागील वर्षीच्या तुलनेमध्ये उन्हाळ कांद्याची लागवड कमी प्रमाणात होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.
त्यामुळे यंदा उन्हाळी कांद्याचे उत्पादन घटणार हे नक्की. यंदा अत्यल्प पाऊस झाला. त्यामुळे भुगर्भ जलपातळीत वाढ झाली नाही. त्यातच भंडारदरा व निळवंडे धरणातील उपलब्ध पाण्याचे अद्यापही नियोजन न झाल्यामुळे लाभधारक शेतकऱ्यांचे रब्बीचे नियोजन कोलमडले आहे.
कमी पाणी असल्यामुळे नेमके कोणते पिक घ्यावे, याबाबत शेतकरी अद्यापही संभ्रमात आहे. यावर्षीच्या पावसाळ्यात अपेक्षित पाऊस न झाल्याने खरीप हंगामाची तर होरपळ झालीच शिवाय पावसाने दडी मारल्यामुळे नद्या-नाले, धरणे-तलाव कोरडेठाक आहेत.
त्यामुळे रब्बी हंगाम घेणे अशक्य आहे. अशी सर्व परिस्थिती असल्याने उन्हाळ कांदा लागवड क्षेत्रात मोठी घट होणार आहे. सध्या उन्हाळ कांद्यासाठी रोपे टाकले जात आहे. तसेच काही ठिकाणी थोड्याफार प्रमाणात लागवड देखील चालू आहे.
प्रवरा व गोदावरी नदी पट्यातील शेतकरी तसेच कालवा खालील लाभधारक व असेच काही थोडेफार शेतकरी रोपे टाकत आहे. तर इतर शेतकऱ्यांनी पाण्याच्या उपलब्धतेनुसार कांदा पिक घेणार आहे.
पाटपाण्याचे योग्य नियोजन झाले तर कांदा या भागातील महत्वाचे पीक मानले जाते. परंतु यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने तालुक्याच्या काही भागामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली होती.
त्यामुळे पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सोडावे लागले. त्यामुळे शेतीच्या पाण्याचे नियोजन नसल्याकारणाने यंदा तालुक्यात उन्हाळ कांदा लागवड कमी होणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.