आनंद भाऊ स्वतःच्या शेतात हळद पिकवतात आणि हळद तयार करून करतात विक्री! हळद विक्रीतून मिळत आहे 4 ते 5 लाख रुपयांचे उत्पादन

Ajay Patil
Published:

शेतकरी बंधू रक्ताचे पाणी करून आणि राबराब राबुन शेतामध्ये विविध पिकांचे उत्पादन घेतात. परंतु जेव्हा बाजारपेठेमध्ये हा शेतीमाल विकायला जातात तेव्हा दर घसरल्यामुळे कवडीमोल दराने शेतीमाल विकावा लागतो व शेतकऱ्यांच्या हातात दमडी देखील पडत नाही. ही स्थिती आपल्याला बऱ्याच शेती पिकांच्या उत्पादनाच्या बाबतीत दिसून येते.

त्यातल्या त्यात नैसर्गिक आपत्तींसारख्या संकटांमुळे तर शेतकऱ्यांवर फार मोठे आरिष्ट कोसळते. या अनुषंगाने जर आपण शेती प्रक्रिया उद्योग किंवा शेतीमालावर प्रक्रिया करून त्याची विक्री करणे या तत्त्वाचा अवलंब केला तर नक्कीच तयार शेतीमाल कमी बाजारभावात विकण्यापेक्षा त्यावर प्रक्रिया करून तो बाजारपेठेत विकणे हे शेतकऱ्यांसाठी फायद्याचे ठरू शकते.

अगदी याच मुद्द्याला धरून जर आपण मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यात असलेल्या वालूर या गावच्या आनंद काळबांडे या तरुणाचा विचार केला तर हा तरुण स्वतःच्या शेतामध्ये दरवर्षी हळद पिकवतो आणि बाजार समितीत न विकता हळदीवर प्रक्रिया करून हळद तयार करतो व थेट ग्राहकांना विक्री करतो. नेमके आनंद काळबांडे या तरुण शेतकऱ्याचे नियोजन याबाबतीत कसे आहे? याबाबतची माहिती आपण या लेखात घेणार आहोत.

 स्वतःच्या शेतातील हळद तयार करून थेट करतो ग्राहकांना विक्री

याबाबत सविस्तर वृत्त असे की, परभणी जिल्ह्यात असलेल्या सेलू तालुक्यातील वालूर या गावचा आनंद काळबांडे हा तरुण शेतकरी असून दरवर्षी तो त्याच्या घरच्या दोन एकर शेतामध्ये हळदीचे पीक घेतो. परंतु प्रत्येकच वर्षी बाजार समितीमध्ये किंवा व्यापाऱ्यांच्या माध्यमातून हळद विक्री केली तर खूप कमी बाजार भाव मिळतो.

हवा तेवढा पैसा हातात येत नसल्यामुळे आनंद काळबांडे यांनी स्वतःच्या शेतात कष्टाने पिकवलेली हळद बाजार समितीत किंवा व्यापाऱ्यांना न विकता ती तयार करून थेट ग्राहकांना विक्री करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. याकरिता त्यांनी मोटार सायकलला दोन चाकी  गाडी बनवली व ती जोडली. यामध्येच त्यांनी एक गिरणी ठेवली. या गिरणीच्या माध्यमातूनच ते थेट ग्राहकांसमोरच हळद कुंडांपासून हळद तयार करतात व विक्री करतात.

या व्यवसायाची सुरुवात करताना आनंद काळबांडे यांनी परभणी शहरांमध्ये हळद विकायला सुरुवात केली. परभणी नंतर हळूहळू छत्रपती संभाजी नगर येथे ग्राहक जोडले. नंतर ते आता पुणे या ठिकाणी हळदीची विक्री करत असून व्यापाऱ्यांना विक्री केलेल्या हळदीपासून जेवढे उत्पन्न मिळत होते त्यापेक्षा दुप्पटचे आर्थिक उत्पन्न आनंद काळबांडे यांना मिळत होते त्यापेक्षा दुप्पट आर्थिक उत्पन्न तयार हळद विक्रीतून मिळत आहे.

याबाबत बोलताना आनंद काळबांडे यांनी म्हटले की, सध्या बाजारामध्ये अनेक माल हा विक्री केला जातो परंतु तो भेसळयुक्त असतो. त्यामुळे ग्राहकांना नैसर्गिक आणि चांगली व भेसळमुक्त हळद खायला मिळावी या दृष्टिकोनातून त्यांनी हा व्यवसाय सुरू केल्याचे त्यांनी म्हटले.

दोन एकर हळद लागवडीतून ते 40 क्विंटल हळदीचे उत्पादन घेतात. जेव्हा ही 40 क्विंटल हळद ते व्यापाऱ्यांना विकत होते तेव्हा त्यांना एकरी दोन लाख रुपये उत्पन्न मिळत होते. परंतु आता थेट हळद तयार करून विक्री सुरू केल्यामुळे त्यांना दोन एकर पासून पिकवलेल्या हळदीच्या माध्यमातून चार ते पाच लाख रुपयांचे उत्पादन मिळत आहे असे देखील त्यांनी सांगितले.

अशा पद्धतीने जर काबाडकष्ट करून पिकवलेल्या शेतीमाल जर वेगळी टेक्निक वापरून विक्री करण्याचे शेतकऱ्यांनी ठरवले तर नक्कीच चांगला पैसा शेतकऱ्यांच्या हातात येऊ शकतो हे आनंद काळबांडे या तरुण शेतकऱ्यांच्या उदाहरणावरून आपल्याला दिसून येते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe