Agriculture News : साखर कारखान्यांचे हंगाम सुरू होऊन महिना होत आला असला तरी साखर कारखान्यांना दैनंदिन पूर्ण क्षमतेने ऊस गळीत करणे ऊस तोडणी मजुरांअभावी अडचणीचे ठरत आहे.
जिल्ह्यातील बहुतेक साखर कारखान्यांना दैनंदिन उसाचा पुरेसा पुरवठा होत नसल्याने पूर्ण क्षमतेने गाळप होत नसल्याचे दिसत आहे. मजुरांअभावी अशी परिस्थिती ओढवली आहे, असे कारखाना व्यवस्थापनाचे मत आहे.
यंदा उसाची टंचाईची झळ एकीकडे साखर कारखान्यांना बसली असताना आता दुष्काळात तेरावा महिना, या म्हणीप्रमाणे ऊस तोडणी मजूर उपलब्ध होत नसल्याने कारखान्यासमोर अडचनीत वाढ झाली.
जिल्ह्यातच नव्हे, तर राज्यात बहुतेक सर्वच साखर कारखान्यात विस्तारीकरण झाल्याने दैनंदिन गाळप क्षमतेत वाढ झाली आहे. हीच वाढ आता साखर कारखान्यांना यंदा संकटात सापडू पाहत आहे. एकीकडे मजूर संख्या घटली, तर दुसरीकडे ऊस उत्पादनही घटले.
त्यामुळे हंगामाची उद्दिष्टपूर्ती, तर बाजूलाच. पण दैनदिन गाळप क्षमता साध्य करणेही जिकिरीचे ठरत आहे. संपूर्ण राज्यातच साखर उद्योगासमोर मजूर टंचाईचे चित्र उभे राहिले. नेवासे तालुक्यातील भेंडे येथील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे उदाहरण घेतले, तर गेल्या हंगामात या कारखान्याकडे ८८७ बैलगाडी टायर व ४५० ट्रॅक्टर होते.
यंदा ही संख्या ३७० बैल टायरगाड्या, २१५ ट्रॅक्टर अशी आहे. अशीच परिस्थिती बहुतेक साखर कारखाना शेतकी व्यवस्थापनाची झालेली दिसत आहे. तोडणी मजूर घटल्याने ऊस उत्पादक व साखर कारखाने अशी दोन्हींची अडचण होत आहे. हंगाम सुरू होऊन महिना झाला तरी कारखान्यांचे शेतकी विभाग तोडणी मजुरांसाठी दाहीदिशांना फिरत आहेत.
ऊसतोड मजुरांची संख्या कमालीची घटली
ऊस तोडणी मजूर म्हंटल की पाथर्डी, बीड अशी ओळख आहे. परंतु गेल्या पाच ते सात वर्षांत तोडणी मजुरांची या भागातील संख्या कमालीची घटली आहे. या भागातील नवी पिढी कोयता झुगारून नोकरी, व्यवसायाकडे वळली आहे.
ऊस तोडणी मजुरांचा परिसर अशी पाथर्डी, बीड भागातील ओळख पुसू लागल्याचे चित्र आहे. आता जळगाव, धुळे, हिंगोली, यवतमाळ भागातून तसेच साखर कारखाना भागातच काही स्थानिक ऊस तोडणी मजूर टोळ्या कार्यरत आहेत. परंतु त्याचीही संख्या ब कमी आहे.