Jayakwadi Water : निळवंडेपाठोपाठ मुळा व भंडारदरा धरणातूनही जायकवाडीच्या दिशेने पाणी सोडण्यात आले आहे. पाणी सोडण्याबाबत समाज माध्यमांवर विरोध होत असताना प्रत्यक्षात पाणी सोडताना विरोध करण्यासाठी कोणीही धरणस्थळी फिरकला नाही.
त्यामुळे विना अडथळा मुळा धरणाच्या ११ दरवाजांतून जायकवाडीच्या दिशेने वाहू लागले. भंडारदरा धरणातूनही १० हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे.
मुळा धरणस्थळी मुळा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सायली पाटील, उपअभियंता विलास पाटील, शाखाभियंता राजेंद्र पारखे, सहाय्यक सलीम शेख, सुनिल हरिश्चंद्रे, कर्मचारी अयुब शेख आदींच्या उपस्थितीत सकाळपासून पाणी सोडण्याचे नियोजन सुरू होते.
पाणी सोडण्यापूर्वी वांजूळपोई, मांजरी, मानोरी, डिग्रस या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांवरील सर्व फळ्या बाजुला काढत जायकवाडीच्या दिशेने पाणी वाहण्यासाठी मार्ग सुकर करण्यात आला. यासह जायकवाडी धरणाचे उपअभियंता गोकुळे यांच्यासह दोन शाखा अभियंता, कालवा निरीक्षक दिनकर लातपटे, बी. एम. टेकुळे, संदिप अंभोरे, एम. वाय. पुंड यांच्या उपस्थितीत मुळा पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाण्याची प्रत्यक्ष पाहणी केली.
२६ हजार दशलक्ष घनफूट क्षमता असलेल्या मुळा धरणामध्ये २२ हजार ८०० दशलक्ष घनफूट पाणी पातळी असल्याचे दाखविण्यात आले. दुपारी १२ वाजता पाणी सोडण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता त्यानुसार सकाळी ११ वाजेपासूनच धरणस्थळी सायरन देण्यात आले होते.
तसेच राहुरी नगरपरिषद व लगतच्या ग्रामपंचायतींमार्फत दवंडी देत सतर्कतेचा इशारा देण्यात आला. पाणी सोडले जात असतानाच मुळा पाटबंधारे विभागाला वरिष्ठांकडून ३ वाजेपर्यंत पाणी न सोडण्याची माहिती देण्यात आली. कार्यकारी अभियंता पाटील यांनी याबाबत पाटबंधारे विभागाशी चर्चा साधत पाणी सोडण्याबाबत फेरनियोजन केले.
अखेरीस पुन्हा ३ वाजेच्या सुमारास सायरन देण्यात आला. कार्यकारी अभियंता पाटील यांच्या मार्गदर्शनात जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या अधिर्कायांसमवेत दरवाजे उघडण्यास प्रारंभ झाला.
११ दरवाजे प्रत्येकी ५ इंच उचलत विसर्ग सुरू झाला. ४ हजार क्युसेकने मुळा धरणातून जायकवाडीच्या दिशेने पाणी झेपावले. विसर्गात वाढ होणार आहे. ८ हजार क्युसेकपर्यंत विसर्ग वाढविल्यानंतर २४ तासातच मुळाचे पाणी जायकवाडी धरणाच्या बैंक वॉटरमध्ये जमा होण्यास प्रारंभ होणार आहे.
जायकवाडी धरणासाठी निळवंडे धरणामधुन पाणी सोडले असतानाच भंडारदरा धरणामधुनही १० हजार क्युसेकने पाणी सोडले असून निळवंडे धरणामधून विसर्ग वाढविण्यात आला आहे, वरिष्ठांच्या आदेशानुसार आणखी विसर्ग वाढविण्याची शक्यता धरण शाखेकडून वर्तविण्यात आली आहे.
भंडारदरा धरणामधुन रविवारी सकाळी ७ वाजता दोन हजार क्युसेकने विसर्ग सुरु करण्यात आला आहे. शेवटची माहीती हाती आली तेव्हा दुपारी ४ वाजता वीजनिर्माण केंद्रामधुन ८४० क्युसेक तर भंडारदरा धरणामधून ७ हजार ८८० क्युसेकने पाणी सोडण्यात आले.
निळवंडे धरणामधुनही रविवारी दुपारी २ वाजता १० हजार क्युसेकने विसर्ग वाढविण्यात आला आहे. निळवंडे च भंडारदरा धरणामधून पाणी सोडण्यात आल्याने आदिवासी भागात धरण उशाला असूनही यावर्षीचा उन्हाळा कड़क राहणार असल्याची प्रतिक्रिया सामान्य जनतेमधून नोंदविल्या जात आहेत.