दिवाळीनंतर वेध लागतात ते हिवाळ्याचे असताना कोल्हार, भगवतीपूरसह प्रवरा परिसरात पावसाळ्यात झाला नाही एवढा धुंवाँधार अवकाळी पाऊस हिवाळ्याच्या सुरुवातीला कोसळला. रविवारी सायंकाळी सुरू झालेला पाऊस सोमवारी सकाळी १० वाजेपर्यंत कोसळल्याने बळीराजावर पुन्हा आस्मानी संकट कोसळले आहे.
नगर जिल्ह्यात नुकतीच थंडीची चाहूल लागली होती. पहाटे सर्व गावे धुक्याच्या चादरीत लपेटले होते; मात्र अचानक ढगांच्या गडगडाटासह आणि विजेच्या कडकडाटासह रविवारी सायंकाळी पावसाळ्याला सुरवात झाली.
हळूहळू पावसाने जोर पकडला आणि रस्ते सुनसान बनले. विद्युत पुरवठाही खंडित झाला, तो दुपारी सुरू झाला. सर्वत्र पावसाने जोरदार बेटिंग केल्याने शेतीमध्ये पाणी साचले होते. हिवाळ्यात स्वेटर शोधण्याऐवजी नागरिकांना आडगळीत पडलेल्या छत्र्या शोधण्याची वेळ आली.
यावर्षी पावसाळा अख्खा कोरडा गेल्यागत जमा आहे. पावसाअभावी पिके सुकली आणि शेतकरी हताश झाला. सध्या दुष्काळी परिस्थितीशी तोंड देत असलेल्या बळीराजावर पुन्हा आस्मानी संकट कोसळले आहे.
या पावसाने शेतीची मशागत किमान १५ दिवस लांबणीवर पडणार आहे. त्यामुळे पुढील पीक घेण्यास उशीर होणार आहे. बळीराजा आधीच ऐन पावसाळ्यात पाऊस आणि दुष्काळाला तोंड देत आहे. त्यात अवकाळीने भर घातल्याने बळीराजाच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.
वीज कोसळली, मात्र जीवितहानी टळली
रविवार व सोमवारी पडलेल्या अवकाळी पावसाने कोल्हारमध्ये काही ठिकाणी वृक्ष कोलमडले, तर काही मेंढ्या पावसाने झालेल्या चिखलात रुतल्या. बेलापूर रस्त्यावर एका ठिकाणी वीज कोसळली मात्र जीवितहानी टळली.
वेचणीला आलेला कापूस भिजला
अवकाळी पावसाचा फटका अनेक पिकांना बसला. यामध्ये वेचणीला आलेला कापूस शेतीमध्येच भिजला आहे. त्यामुळे ज्या पिकांच्या आशेवर पुढील नियोजन होते, ते पूर्णपणे कोलमडून पडले असून बँकेचे कर्ज कसे फेडायचे? या विवंचनेत प्रवरा परिसरात कापूस उत्पादन बळीराजा पडला आहे.